कराड | उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय कराड यांच्याकडून प्रत्येक वर्षी आदर्श तलाठी व मंडल अधिकारी यांना पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा पुरस्कार कराड मंडल अधिकारी महेश पाटील व तलाठी निलेश गवंड यांना प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते व तहसीलदार विजय पवार यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
मंडल अधिकारी महेश पाटील यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल गणेश नलवडे, प्रवीण पाटील, महेश नलवडे, निलेश पाटील, एकनाथ पिसाळ, आनंदराव गुरव, पांडुरंग सरगर, सोमनाथ नलवडे यांनी सत्कार केला. तलाठी निलेश गवंड यांच्याकडे कार्वे, गोपाळनगर या लोकसंख्येने व महसुली क्षेत्राने मोठ्या गावांसोबतच वहागाव, वनवासमाची व घोणशी या गावांचा अतिरिक्त कार्यभार अनेक महिने होता. यावेळी त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांना कराडचे मंडल अधिकारी महेश पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले. विविध महसूल सेवेमध्ये शेणोली मंडल अधिकारी बोडके यांची टीम प्रथम क्रमांकावर राहिली.
यावेळी नायब तहसीलदार विजय माने, बबनराव तडवी, उपनिबंधक तारू, प्रांताधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, तलाठी, मंडलाधिकारी, कोतवाल, पोलिस पाटील यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन युवराज पाटील यांनी केले. निवासी नायब तहसीलदार आनंदराव देवकर यांनी आभार मानले.