सातारा प्रतिनिधी | वाई-खंडाळा-महाबळेश्वर भागातील राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आज समोर आली आहे. आज त्यांचा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आला आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी उपचारासाठी पुण्याला जायचा निर्णय घेतला आहे.
मकरंद पाटील यांचे निकट सहवासित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही आपली तपासणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील यांनी केलं आहे. कोरोना संसर्गाच्या काळातही आमदार मकरंद पाटील हे वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यात सक्रिय होते. तीन तालुक्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, कोरोनाबाधितांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी त्यांचा सातत्याने मतदारसंघात संपर्क आहे.
रोजच्या धावपळीमुळे त्यांना कोरोनाची काही लक्षणे जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी आपली अँटीजेन तपासणी करून घेतली. या तपासणीत ते पॉझिटिव्ह आले. यानंतर त्यांनी जिल्हा रूग्णालयात जाऊन आरटीपीसीआर चाचणीही करून घेतली. त्यामध्येही त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता उपचारासाठी ते पुण्याला जाणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे.