कराड | पाटण तालुक्यातील सोनवडे येथे जनावरे धुण्यासाठी गेलेल्या मामा भाच्याचा मोरणा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अशोक शंकर कदम (वय ३५, रा. सुळेवाडी, ता. पाटण) व अनिकेत हरिबा चव्हाण (१७, रा. जिंती, ता. पाटण) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोनवडे येथे जनावरे धुण्यासाठी अशोक कदम व त्यांचा भाचा अनिकेत गेले होते. बुधवारी सायंकाळीही ते न परतल्याने त्यांचा शोध सुरू झाला. अशोक कदम बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास भाचा अनिकेत यांच्या समवेत मोरणा नदीवर जनावरांना धुण्यासाठी गेले होते. बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी परतले नसल्याने कुटुंबांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, दोघेही सापडले नाहीत. गुरुवारी सकाळपासून शोध सुरू होता, तरीही त्यांचा पत्ता लागला नाही.
त्यानंतर नदीत मृतदेह सापडल्याची माहिती ग्रामस्थांना समजली. त्यांनी खात्री केली. त्या वेळी अनिकेतचा मृतदेह असल्याची खात्री पटली. त्यानंतर काही वेळाने अशोक यांचा मृतदेह नदीत आढळला. मृतदेह पाहून नातेवाईकांनी आक्रोश केला. घटनास्थळी पोलिस निरीक्षक नितीन चोखंडे यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनेचा पंचनामा होऊन नोंद झाली आहे. मृतदेहांची पाटण येथील ग्रामीण रुग्णालयातच उत्तरीय तपासणी झाली. त्यातही बुडून मृत्यूची नोंद झाली आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. अशोक मामा तर अनिकेत भाचा आहे. त्या दोघांचा मोठा जिव्हाळा होता.