हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| इंडिया आघाडीला India Alliance) धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे. ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या या एका निर्णयामुळे इंडिया आघाडीमध्ये फूट पडली असल्याची चर्चा रंगली आहे. आता लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यानंतर ममता बॅनर्जींनी एकला चलो रेचा नारा दिला आहे. त्यामुळे याचा मोठा फटका इंडिया आघाडीला बसू शकतो.
आम्ही एकटेच भाजपला हरवू…
आज माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी म्हटले की, “काँग्रेसशी माझी कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. मी वारंवार म्हटले की, बंगालमध्ये आम्ही स्वबळावर लढू. देशात काय होईल याची मला चिंता नाही, पण आमचा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि बंगालमध्ये आम्ही एकटेच भाजपला हरवू. मी INDIA आघाडीचा एक भाग आहे. राहुल गांधी यांची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जात आहे, पण आम्हाला त्याची माहिती देण्यात आलेली नाही.”
इंडिया आघाडीच फूट पडणार..
त्याचबरोबर, “काँग्रेसने ३०० जागांवर निवडणूक लढवावी आणि प्रादेशिक पक्षांना त्यांच्या भागात भाजप विरुद्ध लढण्यासाठी मोकळीक द्यावी. प्रादेशिक पक्ष एकत्र राहतील, पण त्यांनी हस्तक्षेप केल्यास पुन्हा विचार करावा लागेल” असे देखील ममता बॅनर्जींनी म्हटले. दरम्यान, आगामी निवडणुकांमध्ये भाजपला हरवण्यासाठी राज्यातील प्रमुख पक्षाने एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. मात्र ही आघाडी जास्त काळ टिकणार नाही अशी टीका देखील विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशातच ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व काँग्रेसच्या हाती गेल्यानंतरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये काँग्रेसने 42 पैकी फक्त दोनच जागा जिंकल्या होत्या. तेव्हा, “आम्ही दोन जागा जिंकल्या होत्या आणि आताही त्या जागा जिंकू शकतो, आम्हाला तृणमूलकडून कोणत्याही भिकेची गरज नाही” अशी तीव्र प्रतिक्रिया काँग्रेसच्याच नेत्यांने दिली होती. त्यानंतर काँग्रेस आणि तृणमूल इंडिया आघाडीच्या नावाखाली एकत्र आले. मात्र आता त्यांचा हा एकजूटपणा जास्त काळ टिकणार नसल्याचे दिसून येत आहे.