सांगली प्रतिनिधी । एमआयडीसीमध्ये सहकारी कामगार मित्राच्या एका मूकबधिर अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती करणाऱ्या नराधम परप्रांतीय कामगारास 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. बलरामकुमार रामविलास गौतम असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी सदरची शिक्षा सुनावली. सदरची घटना हि 2018 साली विमल सिमेंट पाईप कंपनीत घडली.
फिर्यादी पीडित अल्पवयीन मुलीचे वडील सन 2018 मध्ये त्यांच्या कुटूंबासह कुपवाड एम. आय. डी. सी. मधील विमल सिमेंट पाईप कंपनीत कामास होते. त्यावेळी आरोपी बलरामकुमार गौतम हा सुद्धा त्या कंपनीत कामास होता. फिर्यादी यांची मुलगी ही मूकबधिर होती. मुलीचे वडील व आई हे कंपनीत कामात व्यस्त असताना मुलगी मूकबधिर तसेच अल्पवयीन असल्याचे माहीत असून देखील तिला खाऊचे आमिष दाखवून गौतम याने तिच्यावर अत्याचार केले. वारंवार अत्याचार करून तिला दोन महिन्यांची गरोदर होण्यास भाग पाडले. सदरच्या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच मुलीच्या वडिलांनी कुपवाड एम. आय. डी. सी. पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
मुलीची वैद्यकीय तपासणी करून आरोपी गौतम विरोधात गुन्हा दाखल करत तातडीने अटक केली. तत्कालीन तपासी अधिकारी एस. ए. शेवाळे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. त्यानंतर विशेष सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांच्या समोर सुनावणी चालू झाली. सरकारपक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले व आरोपीतर्फे दोन साक्षीदार तपासण्यात आले. या साक्षीपुराव्याचे आधारे आरोपी बलरामकुमार रामविलास गौतम यास 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.