हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे पक्ष (Manase Party) शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. म्हणजेच या लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Election 2024) मनसे पक्षाचे सर्व उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवताना दिसतील. आज मुंबईमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या मुंबईमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे. यात मनसे आणि महायुतीमध्ये दररोज बैठका पार पडत आहेत. या मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यात नक्की कोणती चर्चा झाली हे समोर आलेले नव्हते. परंतु यानंतरच लोकसभा निवडणुकीपूर्वीच मनसे पक्ष महायुतीत विलीन होईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली. आता हळूहळू ही शक्यता खरी ठरत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
कारण आजच मुंबईमध्ये राज ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये मनसेला लोकसभेच्या किती जागा देण्यात येईल याबाबत देखील चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप कोणत्याही पक्षाकडून याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु मनसे पक्ष महायुतीसोबत गेल्यास आगामी निवडणुकीसाठी मनसेला दक्षिण मुंबई आणि शिर्डी या दोन जागा देण्यात येऊ शकतात. यात दक्षिण मुंबईमधून अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा भाजपकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुढे कोणत्या घडामोडी घडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.