सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पुसेसावळी येथे कार्यरत असलेला काशीळ गावचा मंडल अधिकारी अवघ्या एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकला. वडिलांच्या नावाचा फेरफार नोंद करण्यासाठी 22 वर्षीय तक्रारदाराला लाचेची मागणी केली होती. केवळ एक हजाराची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडीलाच्या नावाचा फेरफार नोंद करण्यासाठी पुसेसावळी मंडल अधिकारी धनंजय मधुकर भोसले (रा. काशीळ, ता. जि. सातारा) यांनी तक्रारदाराकडे एक हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपाधीक्षक सुजय घाडगे, सापळा पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस नाईक विनोद राजे, संभाजी काटकर यांनी सापळा रचून तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना धनंजय मधुकर भोसले यांना रंगेहात पकडले.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमुळे खटाव व सातारा तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.