हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेची तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केल्यांनतर भाजप नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा हे टीकेचे धनी बनले आहेत. विरोधकांनी लोढा यांच्यावर आक्रमकपणे टीका केल्यानंतर अखेर त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आपण महाराजांची तुलना एकनाथ शिंदे यांच्याशी केलेली नाही असं त्यांनी म्हंटल आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मंगलप्रभात लोढा म्हणाले, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली नाही. जो प्रसंग घडला याची मी तुलना केली. फक्त त्या प्रसंगातील साधर्म्य दाखवण्याचा माझा प्रयत्न होता, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मंगलप्रभात लोढा नेमकं काय म्हणाले होते
आज साताऱ्यातील किल्ले प्रतापगड येथे 363 वा शिवप्रताप दिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंगलप्रभात लोढा यांनी शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेची तुलना शिंदेंच्या बंडाशी केली . शिवाजी महाराजांना औरंगजेबाने आग्रातील किल्ल्यात बंद करून ठेवले होते. परंतु स्वतःसाठी नव्हे तर हिंदवी स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांनी तेथून आपली सुटका करून घेतली आणि त्यामुळेच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली . अशाच प्रकारे एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे खूप प्रयत्न झाले. पण शिंदे सुद्धा बाहेर आले असं म्हणत मंगलप्रभात लोढा यांनी शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेची तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली आहे.