औरंगाबाद : दोन ऑगस्ट रोजी महिलेच्या गळ्यातील नऊ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी पकडले असून मुकुंदवाडी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. विकी उर्फ हेल्मेट गौतम सोनकांबळे आणि योगेश प्रकाश चोतमाल (रा. राजनगर परिसर) अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. आरोपी विक्की हा रेकॉर्ड वरील अट्टल गुन्हेगार आहे.
जय भवानीनगर येथील शिवानी अरविंद गाडवे या दोन ऑगस्ट रोजी सकाळी घराजवळील नळावर पाणी आणण्यासाठी जात असताना दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 9 ग्राम चे सोन्याचे मणी मंगळसूत्र ची पोत हिसकावून नेली होती. याबाबत मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती.
त्यानंतर पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहाय्यक आयुक्त रवींद्र सखोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, हवालदार नरसिंग पवार बाबासाहेब कांबळे, मनोहर गीते, संतोष भानुसे, सुधाकर पाटील श्याम आडे हे तपास करीत असताना चोरट्याचे वर्णन प्राप्त झाले होते. शिवाय ते सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले. त्यानंतर पोलिस आरोपीच्या घरी गेले. तो मात्र घटनेपासून फरार असल्याचे माहिती मिळाली. दरम्यान, 6 ऑगस्ट रोजी तो घरी आल्याचे कळताच पोलिसांनी त्यास पकडले.