Manoj Jarange Patil : …. तर तुमचं सरकार उलथवून टाकेन; जरांगेंचा फडणवीसांना इशारा

Manoj Jarange Patil fadnavis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. २७ ऑगस्टला आंतरवाली सराटीपासून थेट मुंबईपर्यंत मराठ्यांचा भव्य दिव्य मोर्चा ते काढणार आहेत. तत्पूर्वी आज पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्हाला मुंबईला जाण्याचीही गरज नाही, परंतु जर मराठ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आम्ही तुमचं सरकारही उलथवून टाकू शकतो असा इशारा जरांगे पाटलांनी फडणवीसांना दिला.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले, मी आजपासून काहीही बोलणार नाही. मी सरकारला दोन दिवसांचा वेळ देतोय. आम्ही २७ ऑगस्टला सकाळी १० वाजता मुंबईकडे निघणार आहोत. आम्ही अंतरवालीहून मंकाळा, शहागड, शहागड चौक, आंबळटाकळी, तुळजापूर, वाघाडी, पैठणहून मुंबईकडे जाऊ. २७ ऑगस्टला आमचा मुक्काम शिवनेरीवर असेल, त्यानंतर २८ ऑगस्टला आम्ही चाकणला जाऊ… तिथून पुढे तळेगाव, लोणावळा पनवेल, वाशी, चेंबूर या मार्गे आझाद मैदानात पोहचू. २९ ऑगस्टला आपले बेमुदत उपोषण सुरु होईल. आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही, मुंबईत वाहतूक कोंडी करायला जायचे नाही, तर आम्हाला न्यायासाठी जायचे आहे. तुम्ही आम्हाला कोणताही एक रस्ता द्या असं जरांगे पाटलांनी म्हंटल.

मराठा- कुणबी एकच आहेत- Manoj Jarange Patil

आमची प्रमुख मागणी हीच आहे कि मराठा कुणबी एकच आहेत. आणि याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. तुम्ही गेल्या 13 महिन्यांपासून अभ्यास सुरू करताय असा टोलाही त्यानी लगावला. जर तुम्हाला अजूनही अभ्यासच करायचा असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे. आम्ही ऐकू शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्याचे विषय समजून घ्यावे. १० टक्के आऱक्षण आम्हाला नकोय , आम्हाला आमचं हक्काचे घर पाहिजे. भाड्याने घर देऊ नका. आम्हाला हक्काचे आरक्षण हवे आहे. आमच्या दीडशे वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत. सगेसोयरेची अधिसूचना तुम्ही काढली. तिची अंमलबजावणी नाही. तुम्ही त्यावेळेस सांगितले होते की, आम्ही 2012 च्या कायद्यात दुरुस्ती केली. आम्हाला सहा महिन्यासाठी अंमलबजावणीला वेळ द्या. आता दीड वर्ष झाले, तरी तुम्ही काही केलं नाही. सरकारकडूनच नेमण्यात आलेल्या शिंदे समितीकडून 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या होत्या. समिती तुमचीच होती. समितीचा अहवाल सुद्धा स्वीकारण्यात आला, तर मग आडमुठे कोण? असा सवालही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली.