औरंगाबाद – महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच एका आर्थिक वर्षात 167 कोटी 18 लाख रुपयांची विक्रमी वसुली झाली आहे. मालमत्ता करातून 129 कोटी, पाणीपट्टीतून 37 कोटी रु. मिळाले. महापालिकेच्या मालमत्ता विभागाने 7 कोटी 61 लाख रुपये वसूल केले. मागील पाच वर्षांमधील हाही एक उच्चांक असल्याची माहिती प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.
मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी मनपा प्रशासकांनी स्पेशल टास्क फोर्सची निर्मिती केली होती. उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या नेतृत्वाखाली या पथकाची स्थापना केली होती. नवीन आर्थिक वर्षापासून वसुलीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. डिसेंबरअखेरच मनपाने 100 कोटींचा टप्पा गाठला होता. मार्चअखेरपर्यंत सर्व वॉर्ड कार्यालयांनी नियोजित पद्धतीने वसुलीवर लक्ष केंद्रित केल्याने, प्रशासनाला मोठे यश आल्याचे पाण्डेय यांनी सांगितले. वसुलीत यंदा प्रशासनाने आमूलाग्र बदल केले. विविध ठिकाणी नागरिकांसाठी कर भरणा सुविधा केंद्र, धनादेश अनादरप्रकरणी करण्यात येणारी दंडात्मक कारवाई, प्रत्येक वसुली कर्मचाऱ्याला देण्यात आलेले उद्दिष्ट, कर तक्रार निवारण समिती, कमी वेळेत जास्तीतजास्त बिलांचे वाटप, यामुळेच मोठे यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. नवीन आर्थिक वर्षांमध्ये मालमत्ता आणि पाणीपट्टी ई-गव्हनर्सच्या माध्यमातून ऑनलाइन भरता यईल. मालमत्ता कराच्या ऑनलाइन तक्रारी दाखल करता येऊ शकतील.
7 कोटी मालमत्ता विभागाकडून –
महापालिकेच्या मालमत्ता विभागाने मागील आर्थिक वर्षात 7 कोटी 61 लाख 56 लाख रुपयांचा महसूल जमा केला. मागील पाच वर्षांमध्ये मालमत्ता विभागाने एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच वसुली केली नव्हती.