औरंगाबाद – कोरोना काळात शाळा ही ऑनलाइन पद्धतीने सुरू होती. आता ऑफलाइन पद्धतीनं शाळा सुरू झाल्या आहेत. अनेक शाळांना रविवारी सुट्टी दिली जाते. औरंगाबाद महापालिकेने शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी औरंगाबाद महापालिकेच्या शाळा आता शनिवारी आणि रविवारी देखील सुरू राहणार. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हा निर्णय घेण्यात आला. महापालिकेचे शिक्षणाधिकारी अध्यक्षतेखाली रविवारी महापालिका शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक झाली. या बैठकीत महापालिकेच्या शाळा शनिवारी आणि रविवारीही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता विद्यार्थी हे वीकेंडला देखील शाळेत जाणार आहेत.
औरंगाबाद महापालिकेच्या 71 शाळा आहेत यात 13 हजार 500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शनिवार आणि रविवारी शाळेला सुट्टी न देण्याचा निर्णय औरंगाबाद महापालिका शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीत घेण्यात आला.