हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या संपूर्ण देशभरात नवरात्रोत्सव साजरी केला जात आहे. या काळामध्ये भाविक घटस्थापना करून देवी दुर्गेची मनोभावे पूजा करतात. तसेच नवरात्र उत्सवात देवी दुर्गेच्या मंदिरांना भेट देतात. खरे तर, नवरात्रीत मुख्यतः देवी दुर्गेच्या प्रमुख शक्तीपीठांना भेट द्यावी. कारण, असे म्हणतात की, या काळात स्वयम् दुर्गा देवी मंदिरात वास करत असते. पौराणिक कथा आपल्याला सांगतात की, देवी सतीच्या शरीराचे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले तेथे मंदिर मंदिर उभारण्यात आले. त्यामुळे जगभरात देवीची तब्बल 51 शक्तीपीठ आहेत. यातील काही शक्तीपीठ पाकिस्तान, चीन , श्रीलंका येथे देखील आहेत. यात चीनमधले मानसा शक्तीपीठ जगप्रसिद्ध आहे.
मानसा शक्तीपीठ
चीनमध्ये स्थित असणाऱ्या मानसा शक्तीपीठाला भेट देण्यासाठी भाविक भारतातून जात असतात. मानसा देवी ही चीनमधील सर्वात प्रसिद्ध देवी आहे. चीनव्याप्त (China) तिबेटमध्ये देवीचे मानसा शक्तीपीठ आहे. कैलास पर्वताच्या मागे दगडी खडकाच्या रुपात हे शक्तिपीठ त्याठिकाणी वसले आहे. देवीचे हे शक्तिपीठ मानसा सरोवराच्या मागे बसल्यामुळे मानसा शक्तीपीठ असे म्हणतात. त्यामुळे या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी भाविक लांबून जात असतात. तसेच भारतातून देखील भक्तलोक मानसा शक्तीपीठाचे दर्शन घेण्यासाठी जातात.
भाविकांची श्रध्दा
भाविकांच्या मान्यतेनुसार, याठिकाणी देवी सतीचा हात पडला होता. त्यामुळे त्याच जागेवर हे मंदिर उभारण्यात आले. चीन मधील या देवी सतीला ‘दक्षीयणी’ असे म्हणले जाते. चीन मधील हे मंदिर खूप मोठे आहे. मंदिराच्या बाजूने सिंधू, सतल, बह्मपुत्रा या नद्या वाहतात. या मंदिरामध्ये नवरात्रीतच नव्हे तर बारमाही भाविकांची गर्दी असते. विशेष म्हणजे, या देवीला चीनमधील नागरिक देखील तितक्याच मनोभावे पूजतात. मानसा देवी हे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते त्यांचे संरक्षण करते अशी तिथल्या भाविकांची श्रद्धा आहे.
दरम्यान, 51 शक्तिपीठांमधील साडेतीन शक्तीपीठे ही महाराष्ट्रात वसलेली आहेत. यातील पहिले शक्तीपीठ हे कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. दुसरे शक्तीपीठ हे माहूरगडच्या रेणूकामातेचे मंदिर आहे. तिसरे शक्तीपीठ हे तुळजापूरच्या तुळजाभवानीचे मंदिर आहे. तर, अर्ध शक्तीपीठ हे सप्तश्रृंगीगडच्या श्री सप्तश्रृंग देवीचे मंदिर आहे. दरवर्षी नवरात्र उत्सवात या मंदिरात मोठी गर्दी जमलेली असते.