सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
पाणीटंचाईच्या झळा सोसत चातकाप्रमाणे पावसाची वाट बघणाऱ्या तासगाव तालुक्याच्या शहरासह ग्रामीण भागाला चांगलेच झोडपले. सायंकाळी ग्रामीण भागाला पावसाने चांगली हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दुष्काळाच्या अधिक झळा बसलेल्या पूर्व भागातील गावांना चांगलेच झोड़पले. शेताचे बांध भरून सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. या पाण्याने द्राक्षबागायतदार शेतकरी सुखावला आहे. भर उन्हाळ्यात तासगाव तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. पावसाने तालुक्यात द्राक्ष बागांच्या खरड छाटन्या झालेल्या काड्या कशा तयार होणार याची चिंता बागायतदारांना लागली होती. मात्र आज दमदार पडलेल्या पावसाने किमान १० ते १५ दिवसांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
पावसामुळे विरळणी, शेंडा मारणे या कामांना आता गती येणार आहे. दरम्यान तासगाव तालुक्यातील ४९ गावात वॉटरकप स्पर्धेसाठी श्रमदान सुरू होते. आज पडलेल्या पाऊसामुळे काळ्या भुईच्या भेटीला आभाळ आल्याने पाण्याने खोदलेल्या चरी भरून गेल्या होत्या.