धनंजय मुंडे आयोजित बीड कृषी महोत्सवावर मराठा समाजाचा बहिष्कार?? कोणीही सहभाग न घेण्याचे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पुढाकाराने 21 ऑगस्ट पासून परळी वैद्यनाथ येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव (Beed Krishi Mahotsav) आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. मात्र राज्यातील मराठा समाजातील(Maratha Community) बांधवांकडून या कृषी महोत्सवावर बहिष्कार घालण्यात येणार आहे. तशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे कृषी महोत्सवापूर्वीच मराठा समाजाकडून धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा दणका मानला जात आहे.

सोशल मीडियात फिरणाऱ्या मेसेज मध्ये म्हंटलय तरी काय?

जातीयवादी व मराठा विरोधी धनंजय मुंडे यांनी परळी येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवावर राज्यातील मराठ्यांनी बहिष्कार घालायचा ठरवले आहे. मराठ्यांनी ताकद दाखवायची हीच वेळ आहे. परळीतील कार्यक्रम उधळला तर येत्या २९ तारखेपर्यंत सरकार काही निर्णय करेल, अन्यथा मराठे २९ तारखेला निर्णय करतील असं मराठा समाजाने म्हंटल आहे. कोणत्याही मराठ्याने या कृषी महोत्सवाकडे जायचे नाही, कोणीही मराठा बांधवाने या महोत्सवामध्ये स्टॉल लावू नये, कोणीही मराठा बांधवाने या महोत्सवामध्ये जनावरे घेवुन येवू नये, तसेच कोणीही मराठा बांधव किंवा भगिनी या महोत्सवात भाग घेवू नये असं आवाहन करणारा मेसेज सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. महत्वाची बाब म्हणजे याला मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा आणि मूकसंमती आहे अशी सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरातील मराठा समाज हा आक्रमक झाला आहे. ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्या या मागणीवर मनोज जरांगे आजही ठाम आहेत. याच मुद्द्यावरून राज्यातील ओबीसी नेत्यांविरुद्ध जरांगे पाटील यांचे खटकेही उडाले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या नाराजीचा फटका महायुती सरकारला बसला. खास करून मराठवाड्यात मराठा समाजाच्या रोषाला सरकारला सामोरे जावं लागलं. बीडमध्ये पंकजा मुंडे याना बजरंग सोनावणे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला, जालन्यात रावसाहेब दानवे यांचा आपल्याच बालेकिल्ल्यात धक्कादायक पराभवाला सामोरे जावं लागलं होते. तर लातूर आणि नांदेड मधेही काँग्रेसच्या हाताला बळ मिळालं आणि भाजप भुईसपाट झाली. हा सर्व जरांगे फॅक्टरचा प्रभाव आहे असं बोललं जातं. आताही जरांगे पाटलांनी २९ ऑगस्ट पर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला असून पुढची भूमिका जाहीर करू असा इशारा दिला आहे.