Tuesday, June 6, 2023

मराठा मोर्चा | चाकण मधे हिंसाचार करणार्या त्या आंदोलकांना अटक

चाकण | पुण्याजवळील मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या चाकन परिसरात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लावून जाळपोळ करणार्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. पुणे ग्रामीण पोलीसांनी दंगेखोरांना अटक केली असून त्यांना आज न्यायालया समोर हजर करण्याची संभावना आहे. सामाजिक शांतते साठी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत.
३० जुलै रोजी मराठा आंदोलनाच्या मोर्चात भडकलेल्या हिंसाचारात एसटी महामंडळाच्या आणि पुणे शहर परिवहन विभागाच्या सहा बस जळून खाक झाल्या आहेत. तसेच अतुल भापकर हे पोलीस शिपाई हिंसाचाऱ्यांच्या हल्ल्यात कोम्यात गेले आहेत.
चाकण मध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात मी जातीने लक्ष घालत असून हिंसाचाराचा तपास प्रगती पथावर आहे. हिंसाचार घडवणाऱ्या २२ लोकांची ओळख पटली असून त्यांचा आंदोलनाच्या ठिकाणी हिंसाचार भडकवण्यात सहभाग असल्याचे व्हिडिओ क्लिप व्दारे स्पष्ट झाले आहे. यापुढे चाकण औद्योगिक पट्ट्यात आणि शहरात शांतता भंग करण्याचा प्रयत्न करेल त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.