मुंबई | समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आणि इतर मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीनं मराठा क्रांती मोर्च्याची स्थापना करण्यात आली होती. या मोर्च्याला समाजाने मोठ्याप्रमाणात समर्थनही दिले. मराठा मोर्चाच्या नावाखाली राज्यभरात आंदोलनही करण्यात आले. मात्र आता याच मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एकत्रित आलेल्या युवकांना जोडून ठेवण्यासाठी मराठा क्रांती युवा मोर्चाची स्थापना करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश राणे यांनी दिली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी, शैक्षणिक आणि रोजगाराच्या प्रश्नांवर युवा क्रांती मोर्चा कार्य करणार असल्याचं राणे यांनी सांगीतकं. तसेच ‘लवकरच यासंदर्भात मुंबईसह पुणे, नाशिक यांपैकी एका ठिकाणी राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर मराठा तरुणांना एकत्रित आणले जाईल. या सर्व तरुणांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न युवा क्रांती मोर्चाद्वारे करण्यात येईल’. अशी माहिती राणे यांनी दिली आहे.