नंदुरबार | खासदार हिना गावित यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. नंदुरबार जिह्यातील नवापूर, तळोदा या मोठ्या शहरात शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यांमधे कडकडीत बंद पाळण्यात आला असून खबरदारी म्हणून एसटी बस सेवासुद्धा बंद ठेवण्यात आली आहेत.
हिना गावित काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या त्या बैठक आटपून माघारी जात असताना मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडी समोर येऊन गोंधळ घातला. आंदोलक नंतर गाडीवर चढले आणि त्यांनी गाडीच्या काचा फोडल्या. आंदोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज केला आणि हिना गावित यांना तेथून जाता आले. याच कृतीतून आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या असून कालच्या घटनेचा निषेध म्हणून नंदुरबारमधे बंद पाळला जात असल्याचे आदिवासी संघटनांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
दरम्यान बंदच्या पार्श्वभूमीवर कसलाही हिंसाचार उसळू नये म्हणून पोलिसांनी सतर्कता पाळली आहे. जिल्हाभर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून नंदूरबार शहरामध्ये सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे.