पुणे | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. अॅट्रॉसिटी कायद्याच्या बाबतीत सरकार तत्परता दाखवते मग मराठा आरक्षणासाठी तत्परता का नाही दाखवत असा सवाल भोसले यांनी केला आहे. पुणे येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उदयनराजेंच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे.
– सरकार मराठा मुद्दा हाताळताना अपयशी ठरले आहे. आंदोलन हिंसक होण्यास सरकारच जबाबदार आहे.
– मराठा आंदोलनातील मृतांना चार लाखाची मदत आणि घरातील एका व्यक्तीला नोकरी मिळण्याचे आश्वासन सरकार देते आहे याचा अर्थ मराठ्यांनी नोकऱ्या मिळवण्यासाठी आत्महत्या करायच्या का?
– मुक मोर्चे सरकारने गांभीर्याने न घेतल्यानेच आंदोलनाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
– २५ वर्षे मराठा आरक्षणाचा प्रश्न लोंबकळत ठेवला आहे म्हणून तेव्हा पासून आज पर्यंतचे राज्यकर्ते दोषी आहेत.
– सरकार अॅट्रॉसिटी कायद्याच्या बाबतीत तत्पर आहे मग मराठा आरक्षणासाठी का नाही?
मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आणखी तीन महिने असाच रखडून राहण्याची शक्यता उदयनराजेंनी बोलून दाखवली. मराठा समाज मला नेतृत्व करा म्हणतो आहे म्हणून आम्ही मराठा आरक्षण परिषद स्थापन करून पुढील रणनीती आखणार आहे असल्याचे यावेली उदयनराजे भोसले यांनी सांगितले.