हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजामध्ये नाराजी पसरली आहे. यातच खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता समाज बोलणार नाही आता आमदार-खासदार आणि मंत्री बोलतील असं म्हणत त्यांनी मूक आंदोलन छेडले आहे. येत्या 16 जून पासून कोल्हापुरातून या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयापर्यंत लॉंग मार्चचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. कोल्हापुरात मराठा समन्वयकांची बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
आता आमदार-खासदार आणि मंत्री बोलतील
मूक आंदोलन करत असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली. हे आंदोलन 16 जून रोजी सुरू होणार असून कोल्हापुरातून शाहू महाराजांच्या समाधीस्थळावर पासून सुरू होईल. राज्याच्या ३६ जिल्ह्यामध्ये हे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या वेळी बोलताना ते म्हणाले ‘आतापर्यंत समाज खूप बोलला पण आता आपण बोलायचं नाही. आता आमदार-खासदार आणि मंत्री बोलतील आता मराठा समाजाच्या आरक्षणाची जबाबदारी आमदार खासदार आणि मंत्र्यांनी घेतली पाहिजे ‘ असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले आपण कोणताही पक्षासाठी नाही तर समाजासाठी आक्रमक भूमिका घेत आहोत. सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण आता आक्रमक झालो आहोत. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुण्यातून मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढणार असल्याचा इशारा देखील संभाजीराजांनी दिला आहे.आपली बोट बँक खराब होईल म्हणून राजकारणी मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घेत नाहीत. पण मला त्याची काळजी नाही. आता आपण आक्रमक होणार असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे. मी समाजाची दिशाभूल करणार नाही आता आपण डोकं लावून भूमिका घ्यायची असेही ते यावेळी म्हणाले.