… तर आम्हाला OBC मधून आरक्षण द्या!; मराठा क्रांती ठोक मोर्चाची आक्रमक भूमिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मराठा समाजाला EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानंतर त्यावरून जोरदार राजकारण सुरू झालंय. मराठा क्रांती ठोक मोर्चानंही सरकारला गंभीर इशारा दिलाय. मराठा समाजाला SEBC तून आरक्षण देता येत नसेल तर आम्हाला OBC मधून आरक्षण द्या (OBC Reservation), अशी मराठा समाजाची ठाम भूमिका असल्याचं मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आबासाहेब पाटलांनी (Aabasaheb Patil) मांडलीय.

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मराठा समाजानं SEBC चं आरक्षण मागितलेलं आहे. EWS मध्ये आम्हाला घ्या, अशी आमची मुळीच भूमिका नाही. सरकारला मराठा समाजाला SEBC आरक्षण द्यायला येत नसेल तर OBC मधून द्यावे, परंतु EWS चा जो घाट घातलाय तो अत्यंत चुकीचा आहे, असंही आबासाहेब पाटील म्हणालेत.

काही ओबीसी नेत्यांच्या सांगण्यावरून आज मराठा समाजाला EWS मध्ये ढकलायचं सरकारचं काम सुरू आहे हे कदापि आम्ही सहन करणार नाही. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समन्वयकांना घेऊन हे चर्चा करतात आणि सांगतात आमची सकारात्मक चर्चा झाली. या सकारात्मक चर्चेचा आणि आमचा काहीच संबंध नाही. आम्हाला आमच्या हक्काचं SEBC आरक्षण मिळालंच पाहिजे, असंही आबासाहेब पाटील यांनी अधोरेखित केलंय.

सरकारनं महिन्याभरापूर्वी जीआर काढला. मराठा SEBC च्या विद्यार्थ्यांनी खुल्या वर्गातून प्रवेश घ्या. त्याची मुदत काल संपली. मुदत संपल्यानंतर आता तुम्ही EWS चं गाजर दाखवताय. या EWS च्या आरक्षणाचा आमच्या विद्यार्थ्यांना कुठेही फायदा होणार नाही. आम्हाला EWS आरक्षण नको, आरक्षण द्यायचंच असेल तर SEBC किंवा ओबीसीतून द्या, असा पुनरुच्चार आबासाहेब पाटलांनी केलाय.

काही मंडळींचा राजकीय खेळ सुरु- अशोक चव्हाण
काही मंडळींचा राजकीय खेळ सुरु आहे. दोन्ही बाजूंनी बोलणारी लोकं आहेत. निर्णय घेतला तर त्याला विरोध करायचा, अशी भूमिका घेतली जात असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. “मराठा समाजाला EWSच्या सवलतीचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. तेव्हा संभाजीराजे, विनायक मेटे आणि काही लोकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय स्थगित ठेवला. मात्र, SEBCच्या उमेदवारांना EWSचा लाभ मिळावा म्हणून काहीजण कोर्टात गेले. उच्च न्यायालयाने 12 ते 13 प्रकरणात EWSचं आरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. तसंच त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत. EWS आरक्षणाचा कायदा आहे. त्याचा फायदा घेण्यापासून कसं रोखू शकतो?”असा प्रश्न विचारत त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.

खासदार संभाजीराजे आक्रमक
“आतापर्यंत मी सरकार सकारात्मक असल्याचं म्हणत होतो. पण आता आपल्याला गडबड वाटत आहे. 25 जानेवारीला मराठा समाजाच्या आरक्षणावर सुनावणी होणार आहे. पण त्याआधीच सरकार हतबल झाल्यासारखं वाटत आहे. म्हणून हा EWSचा मुद्दा रेटला जात आहे का?” असा प्रश्न संभाजीराजे यांनी विचारलाय. सरकार ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. सरकारच्या भूमिकेत आता आपल्याला गडबड दिसून येत असल्याचं खळबळजनक वक्तव्य संभाजीराजे यांनी केलंय. येत्या 25 जानेवारीच्या सुनावणीत काही गडबड झाली तर त्याला सरकार जबाबदार असेल, अशी आक्रमक भूमिका खासदार संभाजीराजे यांनी घेतलीय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment