शिवरायांनी लाच देऊन आग्र्यातून सुटका केली; मराठी अभिनेत्याच्या वक्तव्यावरून नवा वाद

0
2
shivaji maharaj
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chattrapati Shivaji Maharaj) आग्र्याहून सुटकेला मराठा इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. औरंगजेबाने त्यांना नजरकैदेत ठेवलं होतं, मात्र त्यांनी अतिशय शिताफीने सुटका मिळवली. या ऐतिहासिक घटनेविषयी विविध मतमतांतरे मांडली जात असतानाच ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) यांनी केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

एका यूट्यूब मुलाखतीत बोलताना सोलापूरकर यांनी दावा केला आहे की, महाराजांनी मिठाई व फळांच्या पेटाऱ्यांमध्ये लपून सुटका केली, हा इतिहास रंजकतेसाठी रंगवलेला आहे. शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रमाणात लाच देऊन आणि परवानगीपत्र मिळवून आग्र्याहून सुटका करून घेतली होती. त्यांनी, औरंगजेबाच्या अनेक सरदारांसह वजीर व त्याच्या पत्नीला लाच दिल्याचा दावाही केला आहे.

याशिवाय, महाराजांनी मोहसीन खान किंवा मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र मिळवलं, ज्यामुळे त्यांना मोकळेपणाने आग्र्यातून बाहेर पडता आलं. एवढंच नव्हे, तर शेवटी स्वामी परमानंद पाच हत्तींसह आग्र्यातून बाहेर पडले, त्यासंदर्भात पुरावेही असल्याचं राहुल सोलापूरकर यांनी म्हणले आहे.

राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या या विधानामुळे समाज माध्यमांवर चर्चांना उधाण आले आहे. या वक्तव्यानंतर अनेकांनी सोलापूरकर यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, ऐतिहासिक घटनांमध्ये बदल करून नवीन कथा रचल्या जात असल्याचा आरोप काही इतिहासप्रेमींनी त्यांच्यावर केला आहे. तर काहींनी त्यांच्या विधानावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, राहुल सोलापूरकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध खलनायक म्हणून ओळखले जातात. ९०च्या दशकातील ‘थरथराट’ या चित्रपटातील ‘टकलू हैवान’ ही त्यांची भूमिका विशेष गाजली होती. त्यामुळे आजही अनेक प्रेक्षक त्यांना याच नावाने ओळखतात. त्यांनी ‘नशीबवान’, ‘अफलातून’, ‘पळवा पळवी’, ‘सूर्योदय’ यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांची मनं जिंकली.