चंपावत (उत्तराखंड) | कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आपण सगळेच एकंदरीत त्रासलो आहोत. महिना होऊन गेला सगळे खुराड्यात कोंडल्यासरखे झालेत. परंतू एक डॉक्टर असल्याने माझ्या डॉक्टरी कर्तव्याच्या पूर्ततेसाठी म्हणून मी भ्रमंतीवर आहे.
प्रथम उत्तराखंडविषयी सांगेन. एक तर हा भाग तसा जरा तुटून आहे भारताच्या इतर राज्यांपासून, याचं विशेष कारण म्हणजे इथली भौगोलिक परिस्थिती आणि हवामान. संपूर्णतः डोंगराळ असल्याने वाहतूक मुळात खूप कमी आणि गैरसोयीची आहे. आधीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फार सक्षम नाही आणि त्यातल्या त्यात गावं दूर-दूर आणि दुर्गम. लोकसंख्येची घनता सुध्दा कमी. पण जितका मानवी हस्तक्षेप कमी, तितकंच या जागेचं सौंदर्य मात्र विलक्षण आहे.
या भौगोलिक परिस्थितीचा तोटा म्हणजे गोष्टी लोकांपर्यंत पोहचवणं हे जणू एक आव्हानच आहे. कोविड-१९ च्या संबंधी लोकांमध्ये जागृती आणि या साथरोगाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने आम्ही या विषयावर कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण सत्रे घेत आहोत. या अनुषंगाने खूप वेगवगळ्या भागात माझा प्रवास होतोय. यामुळे खूप समृद्ध असा अनुभव यातून येतोय. म्हणजे अगदी मूलभूत गोष्टींपासून ते अगदी वैश्विक पातळीवरचे विचार आणि परस्पसंबंध ग्रामीण लोक कसे स्थापन करतात याचं दर्शन होतंय. त्यांचे विचार आणि संकल्पना यांची पुरती कल्पना येतेय.
कोरोनाशी लढण्यासाठी म्हणून इथल्या प्रशासनाची विशेष अशी वेगळी तयारी नाही, पण जागरूकता मात्र आहे. विभागातील विविध खाजगी संस्थांशी प्रशासनाने संपर्क साधून कुठल्या प्रकारचे सहकार्य त्या करू शकतील याची नोंद करून ठेवली आहे, ज्या संस्था या वेळेतही कार्यरत आहेत त्यांचा उपयोग वंचित घटकांची माहिती मिळवण्यासाठी करत आहेत. याउलट परिस्थिती मात्र शहरांपासून लांब असलेल्या गावांमध्ये बघायला मिळतेय. दुर्गम व पर्वतीय भागातील ज्या लोकांवर कोरोनाच्या कामाची जबाबदारी प्रशासनाने सोपवली आहे त्यांचं प्रशिक्षण, आजाराबाबतीतलं ज्ञान, स्वतःच्या सुरक्षेसाठी घ्यावयाची दक्षता, जनजागृतीमध्ये त्यांची काय भूमिका आहे, याबद्दल त्यांना कितपत माहिती आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं होतं. त्यांच्या भेटीतून कळून आलं की त्यांना या आजराबाबतीत पुरेशी कल्पना नाही आणि त्यासाठी काय सावधानी बाळगावी हेही त्यांना माहीत नाही. कोरोना नाव सर्वांनी ऐकलंय पण आजार नेमका काय आहे, कसा पसरतो, त्याचे काय काय दुष्परिणाम आहेत, बचावाचे आणि प्रतिबंधाचे उपाय काय आहेत, हातांची स्वच्छता ठेवायची पण ती कशी आणि का, मास्क लावायचा हे माहीत; पण तो कोणी वापरावा आणि कोणी वापरू नये, कसा आणि का लावावा, तो लावलेला असताना काय करावं आणि काय करू नये, त्याचं निर्जंतुकीकरण कसं करावं किंवा विल्हेवाट कशी लावावी याबद्दल या कार्यकर्त्यांना शून्य माहिती आहे. त्यांनी गावात कामासाठी जाताना स्वसुरक्षेसाठी काय काळजी घ्यावी, काय माहिती लोकांना द्यावी, त्यांच्याशी काय व कसं बोलावं हे सगळं त्यांना माहित नव्हतं.
प्रशासनाचा सहभाग म्हणलं तर फक्त एका WhatsApp ग्रुप एवढाच मर्यादित आहे. माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे की नाही किंवा ते त्या माहितीचा अर्थ काय लावताय या बाबत प्रशासन अतिशय निष्काळजी आणि निष्क्रिय दिसते आहे.
गावं इतकी दुर्गम आहेत की तिथवर इंटरनेटची रेंज अजूनही बऱ्याच ठिकाणी नाहीये. त्यांच्याशी बोलताना एक मात्र प्रकर्षानं जाणवलं. बातम्यांचा विशेष प्रभाव साऱ्या ग्रामीण जनतेवर आहे. मग बातमीचा स्त्रोत काय, ती कितपत खरी किंवा मनण्यायोग्य आहे याची पडताळणी तर होत नाहीच याउलट तिचा प्रसार मात्र प्रचंड वेगाने होतो. आणि या बातम्यांद्वारे अफवाही पसरत आहेत. या ग्रामीण दुर्गम भागात अजून कोरोना पोचला नाही पण जर ती या भागात पसरला तर इथली कमकुवत आरोग्यव्यवस्था पाहता त्याचा मुकाबला करणे कठीण दिसत आहे.
डॉ. निशिगंधा महाजन
(लेखिका होमिओपॅथी डॉक्टर असून उत्तराखंडमध्ये एका एनजीओसोबत काम करत आहेत)