राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटांचा डंका; एकदा काय झालं, ‘रेखा’ला पुरस्कार प्रदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज दिल्ली येथील विज्ञान भवनात 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्व विजेत्यांचा सत्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच, अनेक मराठी कलाकार देखील सहभागी झाले होते. आज सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार सलील कुलकर्णी दिग्दर्शित “एकदा काय झालं” या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. तसेच, गोदावरी चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला.

आजच्या पुरस्कार सोहळ्यात शेखर बापू रणखांबे दिग्दर्शित  रेखा या चित्रपटाला सामाजिक विषयावरील माहितीपट म्हणून ज्युरी ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे आजचा दिवस मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानास्पद ठरला. गेल्या 24 ऑगस्टला 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, आज सर्व विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. गंगूबाई काठियावाडी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आलिया भट्टला पुरस्कार प्रदान करण्यात आला. तिच्यासह, मिमी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कृति सेनन हिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

दरम्यान, “राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळणं ही गर्वाची गोष्ट आहे. देशावर कोरोनाचं संकट असताना कलाकार मंडळींनी मनोरंजनाचं काम केलं आहे. तुमच्यासारखी कलाकार मंडळी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आले आहेत. तुमचा कंटेट चांगला असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तुम्हाला चांगली कामगिरी करता येईल” असे आजच्या पुरस्कार सोहळ्यात बोलताना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.