नवी दिल्ली। सलग चार सत्रांतील घसरणीचा फटका बसल्यानंतर सोमवारपासून शेअर बाजाराला मोठ्या आशा होत्या, मात्र गुंतवणूकदारांमध्ये गोंधळामध्ये वातावरण असल्याने बाजारात खळबळ उडाली. त्यानंतर अवघ्या काही तासांतच सेन्सेक्स 1,200 अंकांनी तर निफ्टी 380 अंकांनी घसरला.
रियल्टी, मेटल आणि आयटी निर्देशांकातील जोरदार विक्रीमुळे बाजार बुडाला आणि 58 हजारांच्या खाली पोहोचला. निफ्टीही 17,250 अंकांच्या खाली ट्रेड करत आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांपासून बाजारातील सततच्या घसरणीमुळे आतापर्यंत गुंतवणूकदारांचे 17.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बीएसईवर लिस्टिंग असलेल्या सर्व टॉप 30 शेअर्सनी रेड मार्क गाठले, तर निफ्टीच्या 50 पैकी 49 शेअर्सनी घसरण दाखविली. दुपारी 1:12 वाजता सेन्सेक्स 1,234 अंकांनी घसरून 57,799.70 वर ट्रेड करत होता. निफ्टीही 377.05 अंकांनी घसरून 17,245.50 च्या पातळीवर आला. दोन्ही एक्सचेंजमध्ये 2 टक्क्यांहून अधिकची घसरण झाली.
पाच दिवसांत सेन्सेक्स 3,300 अंकांनी घसरला
शेअर बाजारातील सततच्या घसरणीमुळे सेन्सेक्समध्ये पाच व्यापार सत्रांमध्ये 3,300 अंकांची घसरण झाली आहे. निफ्टीही 1,100 अंकांनी खाली आला आहे. दोन्ही 5.4% ने घसरले आहेत.
‘या’ 5 कारणांमुळे बाजारात विक्री सुरु
परकीय गुंतवणूकदारांची विक्री सुरूच असून यूएस फेड रिझर्व्हकडून व्याजदर वाढवण्याच्या भीतीने गुंतवणूकदारांमध्ये भीती पसरली आहे.
पेटीएम, कारट्रेड, पीबी फिनटेक सारख्या टेक शेअर्स मध्ये मोठ्या घसरणीचा परिणाम संपूर्ण बाजारावर झाला.
देशात दररोज तीन लाखांहून अधिक कोरोना संसर्गाची प्रकरणे समोर येत आहेत, त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण वाढत आहे.
धातूसह इतर कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने कंपन्यांच्या खर्चात वाढ होत असून, त्यांना उत्पन्न बुडण्याचा धोका दिसू लागला आहे.
महागाई आणि ऑफ-सीझन पावसामुळे ग्राहकांचा वापर अपेक्षेप्रमाणे दिसत नाही.