सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. चंदाराणी बाळासाहेब सदाकळे, अभिराज सदाकळे व हिंदुराज सदाकळे अशी त्यांची नावे असून ही घटना सकाळी दहा वाजता उघडकीस आली. या घटनेची तासगाव पोलिसांत नोंद झाली असून तिघांच्या मृत्यूमुळे संपूर्ण सावर्डे गावावर शोककळा पसरली आहे.
चंदाराणी हिचा विवाह दहा वर्षांपूर्वी बाळासाहेब यांच्याशी झाला होता. बाळासाहेब हा काही काळ दुसऱ्याच्या किराणा दुकानमध्ये कामास होता. सध्या त्याने गावात स्वतः ची छोटीशी बेकरी सुरू केली आहे. जोड धंदा म्हणून एक ओमनी गाडीतून शाळेच्या मुलांना सोडण्याचे काम करीत आहे. त्यातूनच त्यांचा कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. दोघांना हर्षद, अभिराज व हिंदुराज ही तीन मुले होती. हर्षद हा तिसरी मध्ये, अभिराज हा पहिलीत शिकत होता तर हिंदुराज हा अंगणवाडीत जात होता. दोघांच्यामध्ये किरकोळ कारणावरून नेहमी भांडणे व्हायची. बुधवारी त्यांच्यात कौटुंबिक वादावादी झाली. चंदाराणी रागाच्या भरात अभिराज व हिंदुराज या दोन मुलांना घेऊन घरातून निघून गेली. त्यानंतर घरातील सर्वांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली मात्र ते मिळून आले नाहीत.
शेवटी बाळासाहेब सदाकळे यांनी तासगाव पोलिसात पत्नी व दोन मुले बेपत्ता असल्याची तक्रार दिली. आज सकाळी गावातील लोढे रस्त्यावरील दिलीप पाटील यांच्या पडक्या विहिरीत एक महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. तो मृतदेह चंदाराणीचा असल्याचे निष्पन्न झाल्या नंतर घटनेनंतर अभिराज व हिंदुराज यांची शोधाशोध केल्या नंतर त्यांचेही मृतदेह त्याच विहिरीत तरंगताना आढळून आले. या घटनेनंतर संपूर्ण सावर्डे गावं सुन्न झाले.