सोलापूर प्रतिनिधी। दिवाळी झाली कि सुरु होते लगीनसराई, या लगीनसराईत अनेकजण आपलं लग्न यादगार बनवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. यामध्ये कुणी अगदीच साधं लग्न करतात तर कुणी शाही पद्धतीने. अशा लग्न समारंभांची चर्चा मात्र सर्वत्र होत असते. असाच एक चर्चेचा विषय ठरलंय सोलापूर मधील लग्न.
आपण लग्नसोहळ्याची सुरवात मंगल अष्टकाने झालेली पाहतो, परंतू वर शशिकांत वाडनाल आणि वधू सौंदर्या गज्जम यांच्या लग्नाची सुरुवात त्यांनी चक्क राष्ट्रगीताने केली आहे. शशिकांत आणि सौंदर्या यांचा विवाह सोमवारी मोठ्या थाटात पार पडला. लग्नाची सुरवात राष्ट्रगीताने झाल्याने हे लग्न सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे.
या नवविवाहित दाम्पत्याच्या संकल्पनेला वऱ्हाडी मंडळींनी देखील उत्स्फुर्द प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रगीत सुरु झाल्यानंतर सर्व वऱ्हाडी मंडळींनी उभे राहून उत्स्फूर्तपणे राष्ट्रगीत म्हटले. तसेच राष्ट्रगीत संपल्यानंतर ‘भारत माता कि जय’च्या जोरदार घोषणा देखील देण्यात आल्या.
सध्या त्यांच्या ह्या लग्नाची जोरदार चर्चा जिल्ह्यासह राज्यभर होत आहे. आपल्या देशाविषयी दाखवलेल्या या आदराबद्दल त्यांचे चांगलेच कौतुक होत आहे. सोशल मीडिया वर देखील या लग्नाची चांगलीच चर्चा होत असून, नेटकरी देखील या अनोख्या विधीला चांगलेच पसंत करत आहेत.