मंगळवेढा : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात पती- पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणच्या एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची निर्घृणपणे हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी पत्नीसह तिच्या प्रियकराला आणि त्यांच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. आरोपी महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केला आहे. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी संबंधित आरोपींनी आत्महत्येचा बनाव रचला होता मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. पोलिसांसमोर त्यांचे सगळे पितळ उघडे पडले.
काय आहे प्रकरण ?
सत्यवान कांबळे असे हत्या झालेल्या 30 वर्षीय पतीचे नाव आहे. ते मंगळवेढा तालुक्यातील शिवणगी येथील रहिवासी होते. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी पत्नीसह प्रियकर प्रशांत अशोक पवार, शाहरुख रफिक शेख, आणि अजय परशुराम घाडगे अशा चार जणांना अटक केली आहे. पोलीस चारही आरोपींची कसून चौकशी करत आहेत. मृत सत्यवान कांबळे यांचं मूळ गाव मंगळवेढा तालुक्यातील रेड्डे हे असून ते लहानपणापासून आजी-आजोबांसोबत शिवणगी या ठिकाणी राहत होते. मृत सत्यवान कांबळे यांचे पाच वर्षांपूर्वी मामा हनुमंत भानुदास गवळी यांच्या मुलीशी लग्न झालं होतं. त्यांनी दोन वर्षांपूर्वी उमदी येथील एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी स्वीकारली होती. त्यांना दोन मुलं देखील आहेत. सगळे काही सुरळीत सुरु असताना पत्नीनं आपल्या प्रियकराच्या अन् त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने आपल्या पतीचाच काटा काढला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला काही वर्षांपूर्वी सांगलीत आरोपी प्रियकर प्रशांत पवार याच्या घरासमोर राहत होती. त्याचवेळी या महिलेचे आरोपी प्रशांत पवार बरोबर सूत जुळले. मागच्या चार-पाच वर्षांपासून ते नियमितपणे एकमेकांना भेटत होते. मात्र मृत सत्यवान हे या दोघांच्या अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरत होते याच कारणातून आरोपी महिलेने आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला. यानंतर घटनेच्या दिवशी मृत सत्यवान हे झोपेत असताना आरोपी महिलेनं आपला प्रियकर आणि त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर या आरोपींनी आपला गुन्हा लपवण्यासाठी पतीच्या आत्महत्येचा बनाव रचला. मात्र पोलिसांना याचा संशय आल्याने त्यांनी कसून चौकशी करत आरोपी पत्नीसह तिच्या प्रियकराला आणि त्यांच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.