नांदेड प्रतिनिधी । माहेरून घर बांधण्यासाठी तीन लाख रुपये न आणल्यामुळे एका विवाहितेला तिच्या दोन मुलांना ठार मारून तीने आत्महत्या केल्याचे भासविणाऱ्या सासरच्या मंडळीवर कंधार पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गोणार येथे रविवारी १ डिसेंबर सायंकाळी घडली. घटना घडल्यासून सासरची मंडळी फरार असून त्यांना जोपर्यंत अटक करणार नाहीत. तोपर्यंत तिन्हीही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा नातेवाईकांना दिला आहे. सध्या विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात तणावाचे वातावरण आहे. विहिरीत टाकणाऱ्या पतीसह पाच जनावर कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक सविस्तर माहितीनुसार, इज्जतगाव येथील रंजना (वय २७) हिचे लग्न गोणार (ता. कंधार) येथील शरद पवळे (वय ३५) याच्यासोबत हिंदु रितीरिवाजानुसार सर्व मानपानासह मोठ्या थाटात सन २००९ मध्ये लग्न झाले होते. सुरवातीला या विवाहिता रंजना हिला काही दिवस चांगले नांदवले. दरम्यानच्या काळात या दाम्पत्याला दिग्वीजय (वय नऊ) आणि वैभवी (वय सहा) अशी दोन गोंडस बाळं झाली. मात्र तिला माहेरून तीन लाख आणण्याचा तगादा लावला. पैसे नाही आणले तर तिचा मानसिक व शारिरीक छळ सुरू केला. परंतु मुलीला सासरी होणारा त्रास कमी व्हावा म्हणू तिच्या वडिलानी कर्ज काढून दीड लाख रुपये दिले. मुलीला त्रास देऊ नका म्हणून विनंती केली. परंतु तिचा छळ काही कमी झाला नाही.
वेळप्रसंगी पती तिला मारहाण करून उपाशी ठेवत असे. ही मंडळी एवढ्यावरच न थांबता रविवारी (ता. एक) नोव्हेंबर सायंकाळच्या सुमारास याच कारणावरून या दाम्पत्यामध्ये वाद झाला. सासरच्या मंडळीनी संगनमत करून रंजनासह तिचा मुलगा दिग्विजय (वय नऊ) आणि मुलगी वैभवी (वय सहा) यांना ठार मारले. आपल्या शेतात असलेल्या विहीरीत तीन्ही मृतदेह फेकून दिले. आत्महत्या केल्याचा बहाणा करून त्यांनी तिच्या माहेरी कळविला. त्यानंतर पतीसह सासरची मंडळी पसार झाली.
नातेवाईकांनी तिचे सासर गाठले. तोपर्यंत घटनास्थळाला कंधार पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली व पंचनामा केला. याप्रकरणी व्यकटेश बालाजी ढगे यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती शरद पंडित पवळे, पंडित नारायण पवळे, मयनाबाई पंडित पवळे, मनोहर पंडित पवळे आणि सुनिता मनोहर पवळे यांच्याविरुद्ध खून व विवाहितेचा छळ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.