शहिद जवान सोमनाथ तांगडे यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

वाई तालुक्यातील ओझर्डे गावाचे शहिद जवान सोमनाथ अरविंद तांगडे (वय-38) यांचे पार्थिव रात्री उशिरा गावी आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बंदोबस्त ठेवला तरी लोकांनी उपस्थित राहून जवान सोमनाथ यांना अखेरचा निरोप दिला. सोमनाथ यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती त्यांना शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सिक्कीम येथे बर्फाळ भागात सेवा बजावत असताना वादळी वाऱ्यात सापडून जवान सोमनाथ जखमी झाले होते. त्यानंतर मिलिट्री हाॅस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमनाथ तांगडे हे आपल्या दोन साथीदांरासह बर्फाच्या टेकडीवर सेवा बजावत होते. दि. ८ एप्रलिला पहाटे ३ वाजता वादळी वाऱ्याने व पावसाने झोडपून काढले. त्या वादळी वाऱ्यात जवानांचा तंबू उडून गेल्याने ते तिघे थंडित कुडकुडत बसले होते. तेथे सोमनाथ बर्फावर पडल्याने ते कोमात गेले होते. दि. ८ पासून त्यांच्यावर मिलिट्री हाॅस्पीटलमध्ये उपचार चालू होते. मात्र शुक्रवारी (दि. १६) त्यांची प्राणज्योत माळवली.

सोमनाथ तांगडे यांचे पार्थिव पुण्यापर्यंत विमानाने आणण्यात आले. रात्री उशिरा त्यांचे पार्थिव गावी आणण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. गावात सोमनाथ तांगडे यांचे पार्थिव येणार असल्याने गावात तसेच भागात अमर रहे जवान असे फलक लावण्यात आले आहेत. अंत्यसंस्कार देण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी फुलांनी ट्रक्टर सजावलेला होता. यावेळी देशभक्तीपर गाणी लावण्यात आली. तसेच शहिद सोमनाथ तांगडे अमर रहे, भारत माता कि जय अशा घोषणा देण्यात आल्या.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like