हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुंबई (Mumbai) शहरातील गोवंडी (Govandi) परिसरात असलेल्या झोपडपट्टीला आग लागल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी पहाटे गोवंडी परिसरातील झोपडपट्टीला ही आग लागली होती. या आगीमध्ये तब्बल 25 ते 30 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तसेच झोपडपट्टीतील लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मुख्य म्हणजे, या आगीची माहिती मिळतात अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी ही आग विझवेपर्यंत 25 ते 30 झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. आता ही आग कशी लागली याचा शोध घेतला जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेतीनच्या सुमारास गोवंडी परिसरातील झोपडपट्टीला आग लागल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. यानंतर स्थानिक लोकांनी ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तसेच याची माहिती अग्निशामक दलाला देखील दिली. अग्निशामक दलाच्या जवानांनी ताबडतोब येऊन ही आग आटोक्यात आणली. या आगीत घरांचे मोठे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या दुर्घटनेची माहिती देत एका अधिकाऱ्याने सांगितले की, “गोवंडीतील आदर्शनगर येथील बैंगनवाडी येथे लागलेल्या आगीत तळमजल्यावरील सुमारे 15 व्यावसायिक युनिट आणि काही घरे जळून खाक झाली आहेत” तसेच, प्लॅस्टिकचे पत्रे, घरातील वस्तू, सामान, लाकडी फळी, फर्निचर पूर्णपणे जळाले आहे या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अद्याप ही आग कशी लागली या मागील कारण काय हे समोर आलेले नाही.”