थकीत बिल वसुलीसाठी कनेक्शन तोडले, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सब स्टेशनलाच टाळे ठोकले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील मसूर येथे महावितरण कंपनीच्यावतीने थकीत बिल वसुलीसाठी मसुर गावच्या पाणीपुरवठ्याचे विद्युत कनेक्शन बंद केल्याचा प्रकार केला. त्यामुळे मसूरच्या सुरळीत पाणीपुरवठा काहीकाळ बंद झाला. दरम्यान ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत महावितरणचे सबस्टेशन टाळे केले.

याबाबत अधिक माहिती अशी, मसूर येथील ग्रामपंचायतीचा 12 वर्षापासून  महावितरण कंपनीकडे लाखो रुपयांचा कर थकीत आहे. त्यामुळे या थकीत कराबाबत ग्रामपंचायतीने वारंवार चर्चेसाठी आमंत्रित करूनही चर्चेस टाळाटाळ करत महावितरणने ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा विद्युत कनेक्शन बंद केले. महावितरणच्या अशा कार्यपद्धतीमुळे संतप्त झालेल्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी कर वसुलीसाठी महावितरणचे सबस्टेशनच सील केले. त्यानंतर नाईलाजास्तव ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठा विद्युत कनेक्शन पूर्ववत करून महावितरणच्या अधिकाऱ्यांना चर्चेसाठी तयार व्हावे लागले.

शुक्रवारी महावितरणने ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठा योजनेचे विद्युत कनेक्शन बंद केले. त्यामुळे गावास होणारा पाणी पुरवठा खंडित झाला. महावितरणच्या मुजोरीला जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय ग्रामपंचायत पधाधिकाऱ्यानी घेतला. त्यानंतर सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, ग्रामविकास अधिकारी विकास स्वामी, ग्रामपंचायत सदस्य संजय शिरतोडे, प्रमोद चव्हाण, सतीश कदम, अक्षय कोरे यांनी मसूरचे महावितरणचे सबस्टेशन सील केले. अखेर एमएसईबीचे सहाय्यक अभियंता चेतन कुंभार यांनी सांगीतल्या नंतर ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठ्याचे कनेक्शन पूर्ववत करण्यात आले. व त्यानंतर ग्रामपंचायतीकडून सब स्टेशनचे सिल काढण्यात आले.

Leave a Comment