पैलवान मतिन शेख यांचे थेट छत्रपती शिवाजी महाराजांनाच पत्र

2
70
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
राज्यात आणि संपूर्ण देशभर आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यापार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील पैलवान मतिन शेख यांनी थेट शिवाजी महाराज यांनाच पत्र लिहिले आहे. शेख यांनी लिहिलेले पत्र खालीलप्रमाणे 
महाराज…
मी तुमचा मावळा होण्यास तयार आहे, पण यासाठी तुम्ही प्रत्यक्ष असायला हवे आहात. तुमचे विचार सांगणारे काही सेनापती फसवे आहेत महाराज. मुळता ते तुमची शिकवण न सांगता स्वतःचाच स्वार्थी, विकृत व चुकीचा विचार पुढे रेटत आहेत.
अठरा अलुतेदार, बारा बलुतेदार सर्व धर्मीयांना सोबत घेवुन तुम्ही रयतेच राज्य निर्माण केलं. समाज एकसंध बांधला पण हाच समाज सध्या काही जण तोडु पाहत आहेत. स्वराज्याचा शत्रु हा परका होता, पण आताचा समाजघातक शत्रु आपल्यातलाच आहे, त्याच काय करावं महाराज…? 
तुम्ही ही राजकारणी होतात पण तुमचं राजकारण अन्यायी राजवटी विरुद्धच होतं, शत्रुला नामोहरम करण्यासाठी, गोर गरिबांच स्वराज्य निर्माण होण्यासाठी तुम्ही राजकारण केलंत पण आता वेगळंच राजकारण होतंय महाराज.
तुम्ही शेतकर्यांचे कैवारी, बहुजवादी, दुरदृष्टी धारक, कुशल संघटक, नीतीमान व व्यवहारी, शुर लढवय्या असे राजे होता…. सर्व जाती,धर्म, पंथ, वर्ग, वर्णातील जनतेला एकवटून तुम्ही शुर मावळ्यांच्या अव्यभिचारी निष्ठेवर आणि असीम त्यागावर, अतुलनीय पराक्रमाने सामान्य रयतेचे स्वराज्य त्यांनी निर्माण केले. जनतेच्या ध्यासातील आदर्श राजा म्हणजे तुम्ही..पण काही मिथकाद्वारे तुम्हाला देवपण देण्यात येत आहे.
आपल्याकडे एखाद्या महान ऐतिहासिक व्यक्तीला देवरुपी अवतार देवुन त्या व्यक्तीमत्वाला दैवत्वाच्या चौकटीत बांधल जातं..तुमच ही मंदीर बांधण्याचा नेहमीच घाट घातला जातोय तर सध्या वेगवेगळ्या माध्यमातुन तुम्हाला दैवी रुपके देण्याचा प्रयत्न होतोय..तुमची प्रतिमा आणि प्रतिके सामान्यजनांना आदराच्या, श्रद्धेच्या आणि निष्ठेच्या वाटतात. त्याच प्रतिमा काही जण उचलतात त्यांना विकृत करुन तुमच्या विचारांचा मुळ गाभाच गारद करतात… 
महाराज, तुमच्या सारख्या शुर पुरूषाला देवरुपी अवतार बनवल्याने तुमच्या विचाराने वागण्याची जबाबदारी रहात नाही, ती जबाबदारी दुर जाते महाराज आणि हाच खरा डाव सारखा रचला जातोय… 
राजकारणामध्ये तुमच्या नावाचा वापर सोयीनुसार होतोय महाराज… 
तुमची विविध प्रतिके रंगवली जातात. तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी, जातीय अभिमानी असल्याचे चित्र बर्याच साहित्य, चित्रपटातुन लोकांसमोर मांडले गेले…मात्र तुम्ही मानतावादी, सामाजिक न्यायाचे प्रतिक होता व आहात महाराज…. 
 अनेकदा सत्तेसाठी, मतांच्या ध्रुवीकरणासाठी सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी तुमच्या नावाचा वापर झाला आणि होतो, यातुन सामाजिक, सांस्कृतिक पेच प्रसंग उभे राहीले, खुपदा समाज दुभंगला, विनाकारण द्वेष वाढला…. 
एकमेकांच्या जाती – पातीचां, धर्माचा द्वेष इथे पेरला जातोय…तुमची खोटी प्रतिके इथे स्वराजकारणासाठी रंगवुन सांगितली जातायेत…तुम्ही तर मानवतेचे, धर्मनिरपेक्षतेचे, समतेचे प्रतिक आहात हे आम्हास पक्क माहित आहे महाराज…पण उगाचच कधी कधी काही फितुर लोकांकडुन तुमच्या या स्वराज्यात गुण्या गोविंदाने राहणार्‍या रयतेत द्वेषाचा, जातीय वादाचा, खोट्या प्रतिकांचा वणवा पेटवला जातो महाराज…. 
हे सर्व माझ्या अनेक भावंडाच्या लक्षातच येत नाही महाराज, ते मात्र गुंग आहेत तुमच्या जयंतीच्या मिरवणुकीत नाचण्यात अन् भगवा घेऊन मिरवण्यात. त्यांना कसं समजावं हे माझ्यासाठी खुप कठिण जातयं महाराज… 
पण काळजी नसावी महाराज… 
आम्ही तुमच्या विचारांचे पाईक आहोत, 
तुमची ही जनता काही फसव्या विचारांना भुलणारी नाही… 
या एकसंघ समाजावर कोणी किती जरी घाव घातले तरी… 
हा समाज तुटणार नाही ही खात्री आहे… 
तुमच्या दृष्टीतलं , तुमच्या भगव्या त्यागातलं स्वराज्य नेहमीच अबाधित राहिल…. 
मुजरा महाराज..
       
पै.मतीन शेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here