मयंक ‘अग्रेसिव्ह’ – सलग दुसऱ्या कसोटीत ठोकले शतक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

क्रीडानगरी । शुभम भोकरे

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला आज सुरुवात झाली. पुण्यातील गहुंजे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना सुरू असून भारताने ८४ षटकानंतर ३ गडी गमावत २६५ धावा केल्या आहेत. मयंक अग्रवालच्या शतकी आणि पुजारा, कोहलीच्या अर्धशतकी खेळीने भारताने सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यश मिळवलं आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मागील कसोटीत दोन्ही डावात शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माला आज लवकर तंबूत परतावे लागले. त्यानंतर मात्र मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी सावध खेळी करत संघाचा धावफलक हलता ठेवला. चेतेश्वर पुजारा अर्धशतकी खेळी करून बाद झाला. मयंक अग्रवालने एक बाजू लावून धरत या मालिकेतील आपले दुसरे शतक झळकावले. शतक पूर्ण झाल्यानंतर तो लगेच बाद झाला. आपल्या १०८ धावांच्या खेळीत मयंकने १६ चौकार आणि २ षटकार लगावले. दक्षिण आफ्रिकेतर्फे कॆगिसो रबाडा याने तीन विकेट घेतल्या. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे सध्या खेळपट्टीवर असून विराट कोहलीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.