कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या मनमानी कारभारा विरोधात जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांच्यासह त्यांच्या गटाच्या नगरसेवकांनी कराड पालिका सभागृहात गुरुवारी आमरण उपोषण केले. तसेच पालिकेतील सर्व प्रशासकीय काम बंद पडले. दरम्यान, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या उपोषणाची दखल घेत मुख्याधिकारी डाके यांना फेर अर्थसंकल्प सादर करण्याच्या सूचना केल्या. दि. 9 तारखेपर्यंत अर्थसंकल्पास मंजूरी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर राजेंद्रसिंह यादव व नगरसेवकांनी उपोषण स्थगित केले. यावेळी गटनेते यादव यांनी नगराध्यक्षा शिंदे यांच्यावर टीका केली. “बंटी और बबली सारखा त्यांचा व त्यांच्या पतीचा कारभार सुरू आहे,” असे यादव म्हणाले.
यावेळी महिला व बाल कल्याण सभापती स्मिता हुलवान, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, नगरसेवक किरण पाटील, गजेंद्र कांबळे, अतुल शिंदे, बाळासाहेब यादव, प्रियांका यादव, सुप्रिया खराडे, बापू देसाई, ओंकार मुळे यांची उपस्थिती होती. या उपोषणास पालिकेचे सर्व ठेकेदार, पालिका कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिला. यावेळी यादव म्हणाले, नगराध्यक्षा एका हॉस्पिटलमधून दर महिन्याला 40 हजार रूपये पगारावर काम करणार्या नगराध्यक्षा आहेत. त्या पगारी नगराध्यक्षा आहेत. एक कलमी पैसे कमवणे हा त्यांचे कार्यक्रम असतो. ठेकेदारांची त्यांनी पिळवणूक केली आहे.
नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी एका सादर केलेल्या अहवालात म्हंटल आहे कि, बजेट बहुमताने मंजूर झाले व नंतर म्हंटले आहे कि, अहवालातील उल्लेख नजरचुकीने झाला आहे. त्यानंतर दिलेल्या अहवालात त्यांनी एकमताने मंजूर झाले असे सांगत आहेत. हा बुध्दीभेदाचा, फसवणूकीचा खेळ पालिकेत सुरू आहे. यामध्ये संपूर्ण शहर भरडले जात आहे, असे यादव म्हणाले. यावेळी हणमंतराव पवार यांनीही नगराध्यक्ष शिंदे यांच्यावर एका केली. नगराध्यक्षा ठेकेदारांच्या टाळूवरचे लोणी खात आहेत. ठेकेदारांचे पैसे हे त्यांच्या घामाचे पैसे आहेत. त्यांच्या कमाईवर त्यांचा काही अधिकारी नाही. मात्र त्यांना ठेकेदाराकडून 14 टक्के टक्केवारी मागितले जाते. कोणतेही काम असले तर ते मंजूर करण्यासाठी टक्केवारी मागितली जाते अशी मनमानी सुरू असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.