हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत सध्या गोवर आजाराची साथ प्रचंड वेगाने पसरत आहे. हा आजार विशेषतः लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. गोवर हा साथीचा आजार Paramyxovirus च्या संसर्गामुळे होतो. जर गोवर आजाराची लागण झालेली व्यक्ती खोकली किंवा शिंकली तर त्यामधून बाहेर येणार विषाणू हवेत पसरतात आणि संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला गोवर आजार होऊ शकतो. मात्र जर एखाद्या व्यक्तीला एकदा गोवर आजार झाल्यास पुन्हा तो त्या व्यक्तीला होत नाही.
गोवर आजाराची लक्षणे –
ताप येणे
खोकला
सर्दी
नाक वाहणे
घसा दुखणे
डोळे लाल होणे
अंग दुखणे
अशक्तपणा येणे
खास करून लहान मुलांमध्ये गोवरचे प्रमाण सर्वाधिक आहे. गोवर झाल्यानंतर मुलांना ताप येतो. कानाच्या मागे गोवरची पुरळ येतात. मुले चिडचिडे होतात, जेवण करताना नीट जेवत नाहीत. याशिवाय डोळ्यातून पाणी येणे, नाक वाहणे, जुलाब, खोकले ही देखील गोवरची लक्षणे आहेत. ५ वर्षाखालील लहान बालकांसाठी आणि २० वर्षाच्या वरील लोकांसाठी गोवर हा प्राणघातक ठरू शकतो.
दरम्यान, मुंबईत गोवरची साथ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ऑक्टोबर महिन्यात मुंबईत गोवरच्या साथीचे ६० रुग्ण सापडले होते. गोवरच्या साथीचा वाढता प्रादुर्भाव पाहता, मुंबई महापालिकेकडून उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणजे ठिकठिकणी लसीकरण करण्यास देखील सुरुवात झाली आहे.गोवरची पहिली लस नऊ ते १२ महिने आणि दुसरी लस १६ ते १८ महिने या वयोगटांत देण्यात येते.