औरंगाबाद | सातारा जिल्ह्यातील कराड येथील एका मेडिकल व्यावसायिकाच्या बॉडीगार्डने औरंगाबाद येथील मेडिकल व्यावसायिकाला चार वर्षापूर्वीच्या उधारीसाठी चाकूचा धाक दाखवत मारहाण केल्याची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. यावेळी मेडिकलच्या गल्ल्यातील 27 हजार 600 रुपये काढून घेत दोन लाखांच्या चेकवर बळजबरी स्वाक्षऱ्या घेतल्या. हा प्रकार 15 सप्टेंबर रोजी घडला. याबाबतची फिर्याद दिल्याने 1 ऑक्टोबर रोजी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रीतम पाटील व श्रणिक जयंतीलाल ओसवाल (दोघे रा. कराड, जि. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत.
याप्रकरणी हरिष विश्वनाथ कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, माझे मेडिकल दुकान आहे. मी 2018 पर्यंत कराड येथील जयंतीलाल ओसवाल यांच्या नवकार इथिकल्स येथून औषधे खरेदी करीत होतो. परंतु सध्या जयंतीलाल यांच्यासोबत हरिष संपर्कात नाहीत. मागील महिन्यात 15 सप्टेंबर रोजी श्रणिक याने हरिष यांना फोन करून माझी तुमच्याकडे बाकी उरलेली असे म्हणाला. त्यावर हरिष यांनी माझ्याकडे काही बाकी नाही, 2018 पासून ‘तुझे बाबा आणि मी संपर्कातही नाही, बाकी निघत असेल तर बाबांना देतो, त्यांना बोलतो’ असे सांगितले. तेव्हा श्रणिक याने वडील आजारी असल्याचे सांगत बोलणे करून दिले नाही.
यावेळी प्रितम पाटील याने हरिष यांना काही कळण्याच्या आतच त्यांना मारहाण केली. मी ओसवाल यांच्याकडून आलो असून पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही, असे म्हणत शिवीगाळ केली. त्याचवेळेस श्रणिक याने फोन करून तुमच्यासमोर असलेला माझा बॉडीगार्ड आहे. पैसे कसे वसूल करायचे त्याला चांगले माहिती आहे, अशी धमकी दिली. त्यादरम्यान संशयित बॉडीगार्डने खिशातून चाकू काढून धाक दाखवत हरिष यांच्या गल्ल्यातील रोख 27 हजार 600 रुपये काढून घेतले आणि प्रत्येकी 50 हजार रुपये किमतीचे चार चेक नवकार इथिकल्सच्या नावाने लिहून बळजबरी हरिष यांच्या स्वाक्षऱ्या करून घेतल्या. पुढच्या आठवड्यात मी येईन तेव्हा रोख दोन लाख द्यायचे, नाहीतर माझा चाकू तुझ्यासोबत बोलेल अशी धमकी देऊन प्रितम पाटील निघून गेला.




