महाविकास आघाडीत फुटीचे संकेत! उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बैठकीत काय शिजलं?

0
2
Pawar And Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची मुंबईतील (Mumbai) सिल्व्हर ओक बंगल्यावर भेट घेतली. तब्बल दीड तास चाललेल्या या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत महत्त्वाच्या चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार, शिवसेना खासदार संजय राऊत आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. खरे तर, शिवसेनेच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. शरद पवार यांनीही या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र अद्याप या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली? हे समोर आलेले नाही.

महत्वाचे म्हणजे, विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांच्या एकत्रित बैठका झालेल्या नाहीत. मात्र दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी आणि शिवसेना गटाच्या स्वतंत्र बैठका सुरू आहेत. अशातच काँग्रेसने आपल्या पक्षातील गटबाजी आणि निष्क्रियतेमुळे महाविकास आघाडीतील समन्वय बिघडला असल्याची टीका राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून केली जात आहे.

दरम्यान, ठाकरे गटाने आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका घेत आघाडीला मोठा धक्का दिला आहे. या घडामोडींमध्येच काल पार पडलेली बैठक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ही बैठक पुढील रणनीती ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते, असे मत तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.