कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
वाळवा तालुक्यातील भवानीनगर येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचार कार्यालयाचा सोमवारी उद्घाटन कार्यक्रम पार पडला. यावेळी कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी विश्वास व्यक्त केला. “मागील संचालक मंडळाच्या काळात कृष्णा कारखान्याची विश्वासाहर्ता कमी झाली होती. पण डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळाने कृष्णा कारखान्याची विश्वासार्हता पूर्वपदावर आणली आहे. त्यामुळे सभासद पुन्हा एकदा सहकार पॅनेलवरच आपला विश्वास दाखवतील, असा विश्वास डॉ. भोसले यांनी व्यक्त केला.
भवानीनगर येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला सहकार पॅनेलचे उमेदवार जितेंद्र पाटील, संजय पाटील, जयवंत मोरे, अविनाश खरात यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. यावेळी कार्यक्रमातील कार्यकर्त्यांना डॉ. अतुल भोसले यांनी मार्गदर्शन केले.
मागील संचालक मंडळाने काय केले हे सभासदांना माहिती आहे. निवडणूक म्हटले की टीकाटिप्पणी आली. पण विरोधकांनी त्यांच्या काळात काय चांगले केले हे त्यांना सांगता नाहीत. आम्ही मात्र या सहा वर्षात काय केले व पुढे काय करणार, याचा लेखाजोखा सभासदांपुढे नेत आहोत. उच्चांकी दर, आधुनिकीकरण, गाळप क्षमता वाढ, सभासदांची विश्वासार्हता जपल्याने, यावेळी सभासद पुन्हा सहकार पॅनेलकडेच सत्ता सोपवतील. सभासदांना योग्य न्याय देण्याची भूमिका सहकार पॅनेलने कायम ठेवली. राज्यात कृष्णा पहिल्या पाचमध्ये आहे. पुढील काळात तो एक नंबरला राहील, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. विरोधकांकडे मुद्दा नसल्याने निवडणूक एकतर्फी बनली आहे, असे डॉ. भोसले म्हणाले.