हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता लवकरच म्हाडा मुंबई म्हाडा (Mhada) मंडळाकडून घरांसाठीची सोडत जाहीर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई म्हाडा मंडळ सप्टेंबर महिन्यात तब्बल 2 हजार घरांसाठीची लॉटरी जाहीर करेल. ज्यात उच्च आणि मध्यमवर्गीयांसाठी घरे उपलब्ध करून दिली जातील. याबाबत म्हाडाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार, आगामी सोडतीमध्ये गोरेगाव मधील आधुनिक इमारतीतील सुमारे 332 घरांचा समावेश असणार आहे. ही घरे उच्च व मध्यवर्गीय लोकांसाठी उपलब्ध केली जाणार आहेत. यामध्ये उच्चवर्गांसाठीची घरे 979 चौरस फूट क्षेत्रफळाची असतील. तर मध्यमवर्गांसाठीची घरे 714 चौरस फूट क्षेत्रफळाची असतील. यात उच्च वर्गीय घरांची किंमत 1.25 कोटी असेल. तर मध्यमवर्ग घरांची किंमत 80 लाख रुपये असेल. त्यामुळे मध्यमवर्गीय लोकांना ही घरे सहज खरेदी करता येतील.
महत्वाचे म्हणजे, सध्या या घरांचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील दोन ते अडीच महिन्यात घरांचे उर्वरित कामही पूर्ण होईल. यामुळेच म्हाडाकडून सप्टेंबर महिन्यात या घरांसाठीची लॉटरी जाहीर करण्यात येऊ शकते. या लॉटरीमध्ये मागील वेळी ज्या घरांची विक्री झालेली नाही त्या घरांचा देखील समावेश केला जाऊ शकतो. असे झाल्यास दोन हजार पेक्षा अधिक लोकांचे या वर्षात घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल.