गावाकडच्या गोष्टी | सकाळी दहा वाजले की आम्ही गावातील बसअड्ड्यावर जमायचो.इस्लामपूर -म्हसवड गाडी बरोबर टायमिंगला साडेदहा वाजता यायची.उन्हाळा पावसाळा हिवाळा गाडी राईट टाइम म्हजी राईट टाइम.या गाडीचे वाहक संजय चव्हाण गमतीने म्हणायचे,’तुमच्या गावात गाडी आली की कामाला जाणाऱ्या माणसांनी खुरपी हुडकायला सुरुवात करायची.आणि पुन्हा माघारी आली की सुट्टी करायच्या नादाला लागायचं.”एवढं या गाडीचं परफेक्ट टायमिंग.
साडेदहा वाजायच्या दिशेनं घड्याळ सरकारच तस आमचं लक्ष रस्त्याकड.माळावरचा धुरळा उडाला की गाडी आली समजायचं.मग हळूहळू गाडी थांबली की आत जायचो.जागा मिळलं तिथं बसून घ्यायचो,नाही मिळाली तरी उभा राहायचो.साधारण 2001 ची गोष्ट सांगतोय.तेव्हा टेपरेकॉर्डरला खूप किंमत आणि या गाडीत तेव्हा टेपरेकॉर्डर बसवला होता. त्याच आम्हाला कौतुक होत.इस्लामपूर ते म्हसवड साधारण 110 किलोमीटर प्रवास.एवढा प्रवास करताना कंटाळा यायचा म्हणून वाहक संजय चव्हाण यांनी खात्याची परवानगी काढून एक टेपरेकॉर्डर गाडीत बसवला. गाडी सजवली.कोणी फोटो दिले,कोणी रंग दिला.कोणी चांगली कॅसेट दिली.त्यामुळं या गाडीचा रुबाब काही और होता.गाडी आपल्याच नादात रोडवर पळायची. लक्ष वेधून घ्यायची.आम्ही रोजचे प्रवाशी. कधी मागे उभा रहायला जर जागा मिळाली नाही तर चालक जहाँगिर मोमीन हे पुढं त्यांच्या केबिनमध्ये प्रवाशांना बसवून घ्यायचे.जहाँगिर मोमीन आणि वाहक संजय चव्हाण यांची फिक्स ड्युटी या गाडीवर होती.
संजय चव्हाण हे पुणे बंगलोर हायवेवर असलेल्या पेठ गावचे.जहाँगिर हे इस्लामपुरचे. या दोघांनी जवळपास 17 ते 18 वर्ष या गाडीची ड्युटी केली.गावोगावी या दोघांच्या ओळखी झालेल्या.बोरगाव-ताकारी-देवराष्ट्र-रामापूर-भाळवणी-विटा-मायणी-ढाकणी-कुक्कुडवाड हा या गाडीचा मार्ग.प्रवास साधारण जायचा तीन तासाचा आणि यायचा तीन तासाचा. या काळात संजय चव्हाण आणि जहांगीर मोमीन यांच्या या भागातील गावागावात ओळखी वाढल्या.या गाडीची माहिती घराघरात गेली.गावागावात गेली. म्हसवड गाडीने आलो ही एक सांगण्याची गोष्ट झाली होती.मी तर अनेकदा या गाडीतून काहीही काम नसताना म्हसवडपर्यत गेलेलो.
गावाच्या अड्ड्यावर गाडी आली की एक म्हातारा माणूस वाहकाच्या जवळ यायचा.हातातील पिशवी त्याला देत म्हणायचा,”म्हस व्यालीय. खरवस न्या.”
“कशाला आबा.”
“तस कस?”अस म्हणून आबा चालते झाले.पुढच्या गावात गाडी आली.एक तरुण पोरग्यान दोन पत्रिका दिल्या.
“भाऊ,मोठ्या भावाचं लग्न हाय.त्यांनाही पत्रिका द्या.”अस म्हणत त्याने ड्रायव्हरच्या दिशेनं बोट केलं.
एकदा विट्यावरून येत होतो.म्हसवड इस्लामपूर गाडीनं. गाडी भाळवणीच्या पुढं आली.दोनचार लोक रस्त्यावर येऊन थांबले.गाडी थांबली.एकजण पुढं येऊन म्हणाला,”जहाँगीर भई, प्रसाद घेऊन जावा.उतरा खाली.’
‘नको गाडी थांबवायला.’
न्हाय न्हाय,आम्ही सकाळपासून प्लॅन आखलाय.’मग ड्रायव्हर जहाँगिर यांनी गाडी थांबवली.सगळ्या प्रवाश्यांना लोकांनी खाली उतरले आणि प्रत्येकाला खीर खाऊ घातली. जेवण झाल्यावर ती माणसं म्हणाली,”तुम्ही दोघांनी खाल्लं आता आम्हाला बर वाटल बघा.”हा प्रेम जिव्हाळा बघायला मिळत होता.
इस्लामपुरला तेव्हा वीस रुपयात कावीळचे गुणकारी औषध मिळत होते.अवघ्या वीस रुपयात.म्हसवड इस्लामपूर रोडवरील कोणत्याही गावातील माणसाने वीस रुपये आणि नावाची चिट्टी दिली की उद्या सकाळ संजय भाऊ आणि जहाँगिरभई औषध घेऊन यायचे.अगदी आडबाजूच्या गावचेही लोक वीस रुपये आणि चिट्ठी घेऊन बसस्थानकावर थांबायचे.कसलीही ओळख नसलेल्या शेकडो लोकांना या चालक आणि वाचकांनी औषध आणून दिलंय. म्हसवडच्या पुढं अगदी पिलीव, माळशिरसला सुद्धा हे औषध पोहोचलं.निव्वळ सेवा.सरकारने या दोघांना गाडी चालवायचे काम नेमून दिलेले पण ते काम करत या दोघांची ही लोकसेवा सुरू होती.अफाट जनसंपर्क झालेला. एखाद्या मोठ्या नेत्याला जे वलय मिळावे तसे वलय या वाहक आणि चालकाला मिळाले होते.गावोगावी जत्रा,घरगुती कार्यक्रम यांच्याशिवाय होत नव्हती.जहाँगिर भई आणि संजू भाऊ हे साधारण तीस पस्तीस खेड्यात प्रसिद्ध झालेले.
गाडीतल वातावरण आजही आठवतंय. गाडीत गाणी सुरू असायची.गर्दी कितीही असो पण कंटाळा यायचा नाही.या गाडीत अनेक गोष्टी घडल्या,अगदी काही प्रेमकथा जुळल्या.काहींची लग्न झाली तर काहींची झाली नाहीत पण या गाडीने अशा अनेक गोष्टी घडवल्या.आज एसटीत बसलेल्या प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे.त्यामुळे त्या गाडीतील अप्रुफ लक्षात येणार नाही पण जेव्हा टेपरेकॉर्डर ही गोष्ट सहजसाध्य नव्हती तेव्हाची ही गोष्ट आहे.
म्हसवड गाडी तशीच सुरू राहिली.आमचं कॉलेज संपलं. आमच्याजागी नवी पोर आली,त्यांच्याशीही संजू भाऊ आणि भै यांची तशीच दोस्ती राहिली.माणसं यायची आणि गाडीत बसून जायची.पुढं पुढं या आगळ्यावेगळ्या गाडीची चर्चा कोल्हापूर विभागात झाली.अनेक गावात चालक आणि वाहकाचे सत्कार झाले.चालक आणि वाहकाने आपल्या सेवेच्या जीवावर सगळ्या मुलखात लोकप्रियता मिळवली होती. खात्यातील अधिकारी लोकांना अजून ही गोष्ट कळली नव्हती पण एकदा पेपरात या गाडीची बातमी आली,छापून आलेलं खर की काय बघायला एका अधिकाऱ्याने गाडीतून प्रवास केला आणि आपल्या चालक आणि वाचकाचा वट बघून तोही गहिवरून गेला.
आमचा गाडीशी संपर्क कमी झाला पण जेव्हा ही बया(गाडी)रस्त्यावर दिसायची तेव्हा जुन्या आठवणी जाग्या व्हायच्या.गाडी म्हसवडकडून मायणीला यायला लागलीय. दूर कुठंतरी माळावर एक म्हातारी हातात पिशवी घेऊन गाडीच्या दिशेनं पळत येतेय ते बघून वाहक बेल मारतो, चालक गाडी थांबवतो.हळूहळू म्हातारी येते,हुस्स करत गाडीत येते आणि मग गाडी मार्गस्थ होते.असे अनेक प्रसंग या गाडीच्या बाबतीत घडले आहेत.
म्हसवड-इस्लामपूर गाडी,तिथं विश्व केवढं?त्याचे चालक आणि वाहक हे दोन सरकारी नोकर. पण सलग अठरा वर्ष या गाडीचा एक काळ होता.एका एसटीने अनेक माणसं जोडली,मित्र झाले,पैपाहुणे झाले.आज गाडीचे चालक सेवानिवृत्त झाले आहेत, वाहक संजू भाऊ सेवेत आहेत.अलीकडच्या काळात ते या गाडीच्या ड्युटीवर नसायचे पण त्याकाळात त्यांनी जोडलेली माणसं एकमेकांच्या संपर्कात आहेत.एकमेकांना सुखदुःख कळवतात.हे सगळं या मार्गावर घडत असताना त्याची कल्पना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबईतील वरिष्ठांना माहिती आहे का?की अशी गाडी आणि असे वाहक चालक आपल्या महामंडळात काम करत आहेत. ज्यांनी अफाट माणस जोडली.आणि टिकवली. सेवेत असलेल्या वाहक संजय चव्हाण यांना फोन केला,त्या आठवणी सांगताना ते गहिवरून गेले. म्हणाले आम्हाला म्हसवड इस्लामपूर गाडीने तुमच्यासारखे लाख मोलाचे दोस्त दिले.आम्ही माणसांची संपत्ती कमावली.जी कधीही संपणार नाही.आता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.”एका एसटीने आमच्या मूलखाच भावविश्व व्यापलेले आहे कधीही न विसरता येणारे…
संपत लक्ष्मण मोरे
9422742925