सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात गतकाही दिवसांमध्ये आंतरजिल्हा टोळीतील दरोडेखोरांकडून जबरी चोरी करण्याचे प्रमाण वाढले होते. दरम्यान, त्यांनी मोटार सायकलवरुन घरी परतणाऱ्या शिक्षक दांपत्यास चाकूचा धाक दाखवत त्यांच्या अंगावरील 55 हजार रुपयांचा सोन्या चांदीच्या दागिन्यांचा ऐवज लुटला होता. दि. 1 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत केलेल्या लुटमारीच्या घटनेबाबत संबंधित दाम्पत्यांनी म्हसवड पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानंतर या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी सापळा रचून 3 दरोडेखोरांना अटक केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात गत काही दिवसांमध्ये जबरी चोरीचे प्रमाण वाढले होते. दि. 1 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास म्हसवड येथून स्वतःच्या मोटार सायकलने जात असताना शिक्षक दाम्पत्यास दरोडेखोरांनी अडवले. त्यांना मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी देवून त्यांच्या अंगावरील सोन्याचांदीचे दागिने असा रोख रक्कम 55 हजार रुपयाचा ऐवज काढून घेतला. यानंतर शिक्षक दाम्पत्याने या प्रकाराबाबतची फिर्याद म्हसवड पोलीस ठाण्यात दिली.
दाम्पत्याच्या फिर्यादीनंतर म्हसवड पोलीस ठाण्याचे स.पो.नि. ढेकळे यांनी पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे, दहिवडी विभागाचे पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, यांना याबाबतची माहिती दिली. त्याच्या सूचनेनंतर स.पो.नि. बाजीराव ढेकळे यांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना देवून त्या अनुषंगाने तालुक्यात व जिल्ह्यात शोधपथके पाठविली होती.
अखेर दरोडेखोरांची माहिती मिळताच सपोनि बाजीराव ढेकळे यांनी पथकासह दरोडेखोर असलेल्या ठिकाणी सापळा रचला. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात तीन दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून अनिल उर्फ संदीप दिलीप लवटे (रा. मेडद, ता. माळशिरस, जि. सोलापूर), कृष्णा रोहीदास भोंडवे (रा. राणंद, ता. माण, जि. सातारा) व संतोष मानसिंग सुर्यवंशी (रा. कळसकरवाडी, ता. माण, जि. सातारा) अशी नावे आहेत. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी त्यांनी भाटकी रस्त्यावरुन जाणारे वाटसरुंना चाकुचा धाक दाखवत लुटल्याची कबुली दिली. तसेच शिक्षक दाम्पत्याकडून चोरी केलेला मुद्देमाल पोलीसांच्या ताब्यात दिला.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग डॉ. निलेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी बाजीराव ढेकळे, सहा. पोलीस निरीक्षक, पो.ना.अमर नारनवर, पो.ना. किरण चव्हाण, पोलीस कॉ. सुरज काकडे, पो. कॉ. अनिल वाघमोडे, पो. कॉ.नवनाथ शिरकुळे, पो.कॉ. संतोष बागल, पो.कॉ. रविकिरण गुरव यांनी केली असुन त्यांचे म्हसवड परिसरातील नागरिकांमधून कौतुक होत आहे.
ढेकळे यांची बाजीरावकी सार्थक
गेल्या काही महिन्यांपासून म्हसवड व परिसरात चोरट्यांनी थैमान घातले होते. दर रोज घडणाऱ्या चोऱ्यानी नागरिकांसह म्हसवड पोलिस त्रस्त होते. या दरम्यान पोलिसांवर चोऱ्या रोखण्याचे प्रचंड आवाहन होते. मात्र, शोधकार्याचा गाढा अभ्यास असलेल्या ढेकळे यांनी सदर प्रकरणात सहकाऱ्यांना सोबत घेऊन जंग जंग पछाडले. त्यातून त्यांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले. या कामात ढेकळेंची बाजीरावकी कामाला आल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. उर्वरित गुन्ह्यांचाही लवकरच तपास लावू, असे अधिकारी ढेकळे यांनी सांगितले.