मिलिंद देवरा यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर मुंबईतील दिग्गज नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गजानन कीर्तिकर, यांच्यासह हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक आहे. मी काँग्रेस सोडींन असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण पूर्वीच्या काँग्रेसमध्ये आणि आत्ताच्या काँग्रेस मध्ये खूप फरक आहे. त्यामुळे मी आज काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. मोदींच्या नेतृत्वाखाली आपला भारत देश सुरक्षित आहे, भारत आणखी मजबूत झाला आहे. मी शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांचे हात आणखी बळकट करेन असं मिलिंद देवरा यांनी यावेळी म्हंटल.

आज सकाळीच मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा सुरु होत्या, आणि आजच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तत्पूर्वी त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले. आणि त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. आपण विकासासाठी प्रयत्न करतोय अशी प्रतिक्रिया त्यांनी सकाळीच दिली होती.

देवरा यांनी काँग्रेसला सोडचिट्टी का दिली?

खरं तर मिलिंद देवरा काँग्रेसचे आणि गांधी घराण्याचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात. त्यांचे वडील मुरली देवरा यांच्यापासून त्यांचे काँग्रेस पक्षाशी घनिष्ट संबंध आहेत. दक्षिण मुंबईतील काँग्रेसचा सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा अशी त्यांची ओळख आहे. या मतदारसंघातून ते २ वेळा खासदार सुद्धा झाले होते. परंतु २०१४ आणि २०१९ मध्ये शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. त्यातच आता ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी असून दक्षिण मुंबई मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केला होता. त्यामुळे मिलिंद देवरा हे नाराज होते आणि याच कारणाने त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याची चर्चा आहे.