हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो साप पाळला आहे, तो त्यांनाच डसेल हे आम्ही त्यांना सांगू इच्छितो असं म्हणत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे. हैद्राबादमध्ये सीएए-एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. सुधारित नागरिकत्व कायद्यावरून ईशान्य दिल्लीत, सोमवारी हिंसाचाराचा आगडोंब उसळला. त्यात एका पोलिसासह सहा जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. यावरून असदुद्दीन ओवेसी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
दिल्लीतील हा हिंसाचार एका माजी आमदारामुळे होत आहेत. आता यामध्ये पोलिसांचा सहभाग असल्याचेही पुरावे आता समोर आले आहेत. त्या माजी आमदारांना त्वरित अटक केली पाहिजे आणि लवकरात लवकर हिंसाचार थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असं न झाल्यास या हिंसाचाराची व्याप्ती वाढेल,” असंही ओवेसी म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असंही ते यावेळी म्हणाले. तसंच त्यांनी हिंसाचार थांबवण्यासाठी पोलिसांवरही दबाव टाकावा, अशी मागणी त्यांनी केली. मी दिल्लीत घडलेल्या हिंसाचाराचा निषेध व्यक्त करतो, ज्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यासह नागरिकांना जीव गमावावा लागला. परदेशी पाहुणे भारतात आलेले असताना अशाप्रकारचा हिंसचार उफळणे ही देशासाठी लाजिरवाणी बाब आहे, असंही ते यापूर्वी म्हणाले होते.