औरंगाबाद – ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे शुक्रवारी औरंगाबाद शहरात आगमन झाले. आज शनिवारी खुलताबाद येथे एमआयएमच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरु आहे. औरंगाबादमधील आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात काय रणनिती आखायची यावर या बैठकीत चर्चा होत आहे. दरम्यान, काल शुक्रवारी असदुद्दीन ओवैसी यांचे औरंगाबादेत आगमन झाले त्यावेळी कार्यकर्त्यांची आणि चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. शुक्रवारी दुपारी जामा मशिदीत नमाज अदा करून ते हॉटेल ताजमध्ये आराम करण्यासाठी निघून गेले. अनेक नगरसेवक आणि कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी आले होते. रात्री खासदार इम्तियाज जलील व इतर पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली.
आज शनिवारी एमआएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी खुलताबाद येथे राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत. त्यात औरंगाबाद निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष रणनीती आखण्यासंदर्भात चर्चा होईल. तसेच येत्या काळात पक्षातील काही पदाधिकाऱ्यांचा खांदेपालट होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्याविषयीदेखील या बैठकीत चर्चा होईल. त्यानंतर दुपारी 3 वाजता असदुद्दीन ओवैसी हे पत्रकार परिषद घेतील.
23 ऑक्टोबर रोजी एमआएमच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी, प्रदेश सचिव मौलाना महेफुज उर्ररहमान फारुकी व खासदार इम्तियाज जलील यांच्यातील मतभेद उघड झाले होते. पक्षातील मातब्बर नेते समजल्या जाणाऱ्या या तिघांमधील मतभेद दूर करण्यावर आजच्या बैठकीत चर्चा होऊ शकते.