औरंगाबाद – शहरात प्रस्तावित व जागा निश्चित झालेले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाविकास आघाडी सरकारने राजकीय हेतुपोटी दबावाखाली पुणे येथे हलवून मराठवाडा व औरंगाबाद जिल्ह्यावर अन्याय केल्याच्या निषेधार्थ एमआयएमच्या वतीने पालकमंत्री सुभाष देसाई यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. खासदार जलील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले.
क्रीडा विद्यापीठ सुरु झाले असते तर मराठवाड्यातील गुणवंत खेळाडूंना याचा भरपुर फायदा नक्कीच मिळाला असता. कोणाच्या दादागीरी वरुन क्रीडा विद्यापीठ औरंगाबादेतुन पळविण्यात आले याचा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी व त्यांच्याशी संबंधित नेत्यांनी सर्वसामान्य जनतेला उत्तर देणे गरजेचे असुन नसता जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. मराठवाड्याशी संबंधित सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीनी धार्मिक भावनांशी खेळून जातीपातीचे राजकारण करणे बंद करुन क्रीडा विद्यापीठ परत औरंगाबादला खेचून आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावे, असे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले.
यावेळी मोठ्या प्रमाणावर एमआयएमच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती. सरकार विरोधी घोषणांनी यावेळी परिसर दणाणला होता. काही काळ या भागात तणावाचे वातावरण बघायला मिळाले.