हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर (Lok Sabha Election 2024) सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील जागावाटपाचा तेढ अजून सुरूच असताना आता दुसरीकडे MIM ने 6 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील एमआयएमचे एकमेव खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी याबाबत माहिती दिली आहे. उमेदवार कोण असतील हे मात्र त्यांनी सांगितलेलं नाही.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना इम्तियाज जलील यांनी लोकसभेबाबत MIM ची भूमिका स्पष्ट केली. MIM महाराष्ट्रातील एकूण ६ मतदारसंघात लोकसभा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितलं. यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड.. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, विदर्भातील अकोला आणि आणखी एका मतदारसंघाचा आणि मुंबईतील एका जागेचा समावेश आहे. आम्ही यापेक्षा जास्त जागा सुद्धा लढू शकतो, मात्र सध्या तरी या जागा निश्चित झाल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितलं.
MIM कोणकोणत्या लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उभे करणार याबाबत जलील यांनी माहिती दिली असली तरी उमेदवारांची नावे मात्र त्यांनी जाहीर केलेली नाहीत. आधी सर्व पक्षांचे उमेदवार घोषित होऊ देत, जेव्हा सर्व पक्षांच्या याद्या जाहीर होतील, तेव्हा कुठे ना कुठे नाराजीचा सूर पाहायला नक्कीच मिळेल त्यावेळी आम्ही आमचे पत्ते ओपन करू असं इम्तियाज जलील यांनी म्हंटल. MIM च्या उमेदवारांमुळे आत्तापर्यंत इतिहास बघितला तर महाविकास आघाडीलाचा तोटा झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा MIM मुळे महाविकास आघाडीलाच फटका बसण्याची आणि भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे.