औरंगाबाद – मुस्लीम आरक्षण आणि वक्फ बोर्डच्या प्रश्नावर एमआयएमची तिरंगा यात्रा शनिवारी मुंबईत धडकणार आहे. यात्रेत प्रत्येक वाहनावर तिरंगा असेल, उद्या पहाटे औरंगाबाद येथून अहमदनगर, पुणे मार्गे सर्वजण मुंबईला पोहचतील, तर राज्यातील अनेक भागातून वाहने थेट मुंबईत येतील, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी आज दिली. तसेच मुंबईत होणाऱ्या सभेचे ठिकाण मुद्दामहून गुलदस्त्यात असून ते उद्याच कळेल, असेही त्यांनी या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
पुढे बोलताना खा. जलील म्हणाले, एमआयएमतर्फे मुस्लीम आरक्षण आणि वक्फ बोर्डाची जमीन यावर आंदोलन पुकारण्यात आले आहे. राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा विषय न्याय प्रविष्ठ आहे. मात्र, मुस्लीम आरक्षण देण्यात यावे असे न्यायालयाचे निर्देश असतानाही ते मिळत नाही, अशी मुस्लिमांची स्थिती आहे, ते तत्काळ लागू करावे अशी मागणी एमआयएमतर्फे सातत्याने करण्यात येत आहे. यासोबतच दुसरी मागणी ही वक्फ बोर्डा संबंधित आहे. वक्फ बोर्डच्या जमिनीसंदर्भात आम्ही शरद पवार, फौजिया खान आदींना भेटलो, मात्र यावर समाधानकारक उपाय मिळाला नाही. राज्यातील अनेक प्रकल्पात वक्फ बोर्डाच्या जमिनी गेल्या आहेत, त्याचा मोबदला संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा आहे, हि रक्कम जवळपास 1 हजार कोटी आहे. ती रक्कम मुस्लीम समाजासाठी वापरावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. मुंबईत सभा पाच वाजता असून त्याचे ठिकाण ऐनवेळी कळविण्यात येईल, असे खा. जलील यांनी जाहीर केले.
आता माघार नाही –
दोन्ही मुद्दे राजनीतिक नसल्याने राज्यातील सर्व पक्षांमधील मुस्लीम नेत्यांना आम्ही पत्र पाठवून यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यात्रेसाठी आम्ही मार्गावरील सर्व शहरात पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. पहिल्या वेळी यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र यावेळी कोणत्याही कारणांनी आम्ही यात्रा आणि मुंबईतील सभा रद्द करण्यात येणार नाही, असा इशारा खा. जलील यांनी यावेळी दिला.