‘माझी आणि दानवेंची बरोबरी होणे शक्य नाही’; शिवसेनेत गटातटांचे राजकारण

ambadas danve
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शिवसेनेत शिवतेज आणि शिवसंवाद मोहिमेवरून गटातटांचे राजकारण पाहायला मिळाले. यातून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे असे दोन गट असल्याच्या चर्चेला खैरे यांनी बुधवारी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. माझी आणि आमदार दानवेंची बरोबरी होणे शक्य नाही. मी शिवसेनेच्या 13 नेत्यांपैकी एक असल्याचे खैरे यांनी स्पष्ट केले.

मागील अनेक वर्षांपासून खैरे आणि दानवे यांच्यातील संवाद दुरावला असून, कोणत्या न कोणत्या निमित्ताने गटबाजी चव्हाट्यावर येते. खैरे यांनी बुधवारी शिवसेना पक्षघटनेचा हवाला देत कोणाचे काय अस्तित्व आहे, हे स्पष्ट केले.

शिवसेनेत जातीय वादाचे राजकारण मूळ धरीत आहे. आमदार दानवे आणि खैरे असे गट पडले आहेत काय, शासकीय समित्यांवरील नियुक्त्यांवरून तसे दिसते आहे, असे विचारता खैरे म्हणाले, माझी आणि दानवे यांची एक लेव्हल नाही. मी पक्षातील 13 नेत्यांपैकी एक आहे. पक्षघटनेतील तरतुदीनुसार ते पद आहे. नेते, उपनेते, संपर्कनेते आणि नंतर जिल्हाप्रमुख असा क्रम आहे. त्यामुळे दानवे आणि माझी बरोबरी असण्याचा प्रश्नच येत नाही.

‘सत्तार आता भगवे झाले आहेत’ –

राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि तुमचे सूर जुळले आहेत. यामागे नेमके कारण काय? यावर खैरे म्हणाले, सत्तार आता भगवे झाले आहेत. त्यांनी कार्यालयही भगवे केले आहे. पक्षप्रमुखांनी जादू केली आहे त्यांच्यावर. त्यामुळे ते भगवे झाले आहेत. जि. प., पं. स. निवडणुकीत त्यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे.