हमी भावाने उडीद खरेदीला १ ऑक्टोबरपासून सुरुवात – बाळासाहेब पाटील

Balasaheb patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने उडीद खरेदीला दि.१ ऑक्टोबर २०२० पासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. श्री.पाटील म्हणाले, केंद्र शासनाने उडीदसाठी हमी भाव प्रती क्विंटल ६ हजार रुपये जाहीर केला आहे. चालू हंगामात उडीद आवक बाजारात सुरु झाली आहे.

बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहेत. खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी दि. १५ सप्टेंबर २०२० पासून नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार उडीद खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे त्याच केंद्रावर एसएमएस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा. सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

शेतकऱ्यांनी आपआपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. नोंदणीकरिता आधारकार्डाची छायांकित प्रत आणि पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करावा. तसेच शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर नोंदवावा. केंद्र शासनाकडे हमीभावाने उडीद खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव दि.३१ ऑगस्ट २०२० ला पाठविण्यात आला होता त्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे, असेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’